रेडा वेद म्हणाला असे पुराणकाळात म्हटले जायचे त्याला विज्ञानाचा काही आधार आहे का?

तुम्हांला जर ठाऊक नसेल तर एक गोष्ट आधी जाणून घ्यावी आणि ती निरंतर ध्यानी ठेवावी आणि ती म्हणजे 'ज्ञानेश्वर माउली' हे सिद्ध होते, म्हणजेच ते 'पूर्णब्रह्म' होते आणि त्यामुळे ब्रह्माच्याठायी असलेले सर्व गुण त्यांच्यात होते.

म्हणजेच ज्याप्रमाणे 'ब्रह्म' जसे नित्यसिद्ध असते, म्हणजेच कोणत्याही काळी कोणताही रंग, रूप, आकार धरण्यास जसे ते नित्यनिरंतर सिद्ध/तत्पर/सज्ज असते, त्याप्रमाणेच माउली देखील होते. कारण ते स्वतःच 'परब्रह्म' होते, ते नाथपंथीय होते, त्यांनी कुंडलिनी मार्गे जाऊन 'अष्टमहासिद्धी' वश केल्या होत्या. त्यामुळे ते कितीही देहात दिसत असले तरीही ते 'परब्रह्म' होते हे 'ध्यानात' घ्यावे आणि म्हणूनच ज्याप्रमाणे देवाला काहीही अशक्य नाही, त्याप्रमाणेच त्यांना देखील काहीही अशक्य नव्हते.

आणि मुख्य म्हणजे विज्ञान वगैरे ह्या गोष्टी लौकिक आहेत, त्याच्या साहाय्याने अलौकिक गोष्टी कशा काय सिद्ध करणार? देव हा प्रकृतीच्या पल्याड आहे, त्याला श्रद्धेनेच अनुभवता येते, अन्यथा नाही.

*********************************************

🚩🚩आणि म्हणूनच तुकोबा म्हणतात की येथे संदेह निर्माण करणारे बरेच लोक आहेत जे इतर लोकांच्याठायी देखील शंका निर्माण करतात आणि त्यांना चुकीच्या मार्गावर घेऊन जातात परंतु लोकांनी मात्र तसे आंधळेपणाने वागू नये आणि स्वतःच्या मनाला नको त्या संदेहात घालू नये किंबहुना स्वतःच्या आवडीच्या ठायींच त्याने विश्वास ठेवावा आणि तो वृद्धिंगत करत न्यावा....

*********************************************

बहुतां छंदांचे बहु असे(वसे) जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ।।

करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ।।

सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ।।

तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की येथे या संसारात विविध छंदाची लोक नांदतात आणि त्यांच्या नानाविध धारणा आणि मते असतात परंतु आपण मात्र आपले मन त्यांच्या संगतीत राहून आणि त्यांच्या नादी लागून त्या त्या विषयी वाटून देऊ नये. उलट आपल्याला जेथे आवडी असेल, आपल्या अंगी ज्या विषयाची गोडी असेल, रस असेल त्याठायी श्रद्धा धरावी, तेथेच आपला विश्वास जतन करावा.

ते म्हणतात कारण श्रीज्ञानेश्वर माऊली भक्तांना म्हणजेच श्री हरि चरणी श्रद्धा ठेवून असणाऱ्यांना हरिकथा सांगतात, म्हणजेच हरीकथारूपी अमृतपान देणारी ही माउली असून श्रद्धावंतांना तेथेच सुखाची समाधि प्राप्त करून देणारी आईच आहे किंबहुना या विश्वात जे संसारामुळे आणि त्याच्या व्यापाने शिणले आहेत, त्रासले आहेत त्यांना विश्रांती मिळवून देणारी सावलीच आहे.

परंतु ज्यांना त्याठाई विश्वासच नसेल त्यांना हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तो व्यर्थच जातो, कारण अशांना कितीही सांगितले तरीही ते काही त्यांच्या पचनी पडत नाही.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की जे स्वतःच अंगाला दगड बांधून पाण्यात उडी घेतात त्यांना वाचवण्यासाठी धाव घेणे हे देखील कष्टाचेच काम आहे, कारण जेथे अंती हाती काहीही लागणार नसेल तेथे कष्ट उपसण्याचे कामदेखील कोण करेल? म्हणजेच ज्यांना स्वतःहून अविश्वासाच्या आणि संदेहाच्या डोही जर उडी घालायची असेल तर त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे कौतुक कोणी चुकूनही करणार नाही.

अभंग ३३८०

*********************************************

🚩🚩परंतु त्याकाळीदेखील हे सर्व न पटून लोकं विरोधात बोलायचीच, कारण ज्यांना विश्वास नाही किंवा काही वेळा तो मान्य करण्याचा मोठेपणा नाही ते असेच बोलून संतांचा अव्हेर करायचे, त्यांची निंदा करायचे परंतु अशा त्या लोकांच्या वतीने ते माउलींकडे जातीने क्षमायाचना करतात, ते माउलींना उद्देशून म्हणतात की...

*********************************************

बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ।।

करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ।।

नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ।।

तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ।।

*********************************************

तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींना उद्देशून म्हणतात की तुम्ही आमची माऊली आहात आणि आम्ही तुमची लेंकुरें, त्यामुळे तुमची लेकुरे तुम्हां विरुद्ध काही वेडेवाकडे बोल बोलले असतील तर त्यांना क्षमा करावीत, त्यांची चूक पोटात घ्यावीत, त्यांचा अपराध दृष्टिआड करावा. कारण ते म्हणतात महाराज तुम्ही 'सिद्ध' आहात, म्हणजेच तुम्ही स्वयम् 'परब्रम्ह' आहात, तुम्हां पोटी सर्वांप्रति वाव आहे. तसेच इतर सर्वांप्रमाणे मीदेखील तुमच्या लेकरांपैकीच एक आहे. त्यामुळे माझा स्वतःचा अधिकारदेखील लक्षात न घेता मी जर तुम्हाला काही उपदेश केला असेल, काही सूचना केली असेल तर तीदेखील तुम्ही क्षमा करावी आणि माझीदेखील चूक पदरात घ्यावीत.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की हे ज्ञानेश्वरा, हे माऊली तुम्ही आम्हां सर्वांवर कृपादृष्टी फेरून आम्हा किंकरांना म्हणजेच तुमच्या दासांना आता नित्य तुमच्या पायापाशी राखावे.

अभंग ३३७३

*********************************************

🚩🚩असे हे ज्ञानोबा माउली जेव्हा रामेश्वर भट्टांकडे तुकोबांची स्तुती करतात, त्यांची थोरवी गातात तेव्हा गहिवरून जाऊन ते माउलींना म्हणतात की...

*********************************************

ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ।।

मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ।।

ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळंगणे । इतर तुळणें काय पुरे ।।

तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोईं ।।

*********************************************

तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलींना उद्देशून म्हणतात की हे ज्ञानदेवा, अहो माऊली तुम्ही येथे सर्व ज्ञानियांमध्ये श्रेष्ठ आहात, त्यांचे गुरु आहात किंबहुना सर्व राजांचे महाराजच आहात आणि म्हणून तुम्हाला 'ज्ञानदेव' म्हणजे 'ज्ञानाचा देव असे संबोधितात. त्यामुळे तुमच्यापुढे माझ्यासारख्या पामराचे काय ते थोरपण, काय तो मोठेपणा, मी तर तुमच्या पायाची वहाण असून तेथेच चांगली शोभून दिसते.

ते पुढे म्हणतात एवढेच नव्हे तर जेथे ब्रह्मादिक देव तुमची सेवा करण्यासाठी येतात, तुमच्या पायाशी वोळंगतात त्यांच्यापुढे आमच्यासारख्या सामान्यजनांची काय तुलना होणार? किंबहुना ती न केलेलीच बरी.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की तुमच्याठायी असलेल्या युक्तीची खोली म्हणजेच ज्ञानाची खोली आणि थोरवी आम्ही कितीही जाणून घ्यायची ठरवली तरीही ती संपूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच नतमस्तक होऊन आम्ही तुमच्या पायावर आमचे मस्तक ठेवले आहे.

अभंग ३३७२

*********************************************

🚩🚩तुकोबा श्री ज्ञानेश्वरांची, माऊलींची थोरवी सांगताना, त्यांचे गुण गाताना म्हणतात की...

*********************************************

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ।।

करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ।।

जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ।।

तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्तीचिया ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या दारी सोन्याचा पिंपळ आहे आणि ज्याच्या अंगी रेड्याला देखील बोलते करण्याचे बळ आहे असे ज्ञानेश्वर महाराज येथे ह्या विश्वात काय करू शकत नाही सांगा मला? परंतु तसा अनुभव येण्यासाठी किंवा तशी दृष्टी प्राप्त होण्यासाठी पाहणारा मात्र शुद्ध बीजाचा हवा, म्हणजे हरिनामाच्या चिंतनाने आणि त्याच्या चरणसेवेने त्याचे मन आणि चित्त निर्मळ आणि शुद्ध झालेले हवे, तर आणि तरच त्याला जे अलौकिक आहे ते दिसू शकते किंवा अनुभवास येऊ शकते.

ते पुढे म्हणतात अशा या ज्ञानदेवांनी मुक्तीची देखील हेटाळणी केली, म्हणजेच समाज कल्याणासाठी मोक्षाकडे देखील पाठ फिरविली आणि वैष्णवांना एकत्र आणून आणि जमवून त्यांना नामाचा बीजमंत्र दिला.

तुकोबाराय शेवटी म्हणतात म्हणूनच अशा ह्या माऊलीच्या चरणी मग सुखाला काय उणे असणार सांगा बरे? किंबहुना अशाठायी सर्वांनी फक्त समाधान चित्ताने राहावे, आनंदाने त्यांची सेवा करावी म्हणजे योग्य वेळी उचित फळ पदरात पडलेच म्हणून समजा.

अभंग ३३७९

*********************************************

🚩🚩तुकाराम महाराज म्हणतात आणि येथे तेच शुद्ध जातीचे किंवा बीजाचे असतात जे मनात संदेहाला अधिक काळ थारा देत नाहीत, उलट तो दूर सारून लवकरात लवकर घरी परततात...

*********************************************

धन्य शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ।।

ऐकिलें तें चि कानीं । होय परिपाक मनीं ।।

कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ।।

तुका म्हणे भाव । ज्याचा तोचि जाणा देव ।।

*********************************************

तुकाराम महाराज म्हणतात जे घरी लौकर परततात, जे माघारी लवकर वळतात म्हणजेच परमार्थाचे नाव ऐकल्यावर जे त्याकडे लगेचच वळतात ते खरे शुद्ध जातीचे आहेत असे जाणावे. ते म्हणतात परमार्थाविषयी ऐकल्यावर ज्यांच्या मनावर लगेचच परिणाम होऊन मनी परिपाक वाटतो, म्हणजेच ऐकलेल्या पारमार्थिक गोष्टींवर मनात संदेह निर्माण न होता ज्यांना त्याविषयी त्वरित ओढ निर्माण होते, गोडी वाटू लागते असे लोक खरे शुद्ध बीजाचे असतात.

तसेच जी माणसे स्वतःच्या हितासाठी नेहमी जागरूक असतात, सावधान असतात आणि इतरांविषयी देखील पोटात नित्य कळवळा दाटून येतो तेच खरे शुद्ध जातीचे.

तुकोबाराय शेवटी म्हणतात असा ज्याचा भाव शुद्ध आहे, चित्तात निर्मळ आणि शुचित्व आहे, अशी व्यक्ती किंवा असा मनुष्य हा देवासमानच आहे असे ओळखावे, किंबहुना त्याच्याठायी देवालाच पाहावे कारण असा मनुष्य तो स्वतःच स्वतःचा देव असतो. (म्हणजे अशा माणसाला मार्गदर्शनासाठी इतर साधारण माणसांकडे देव किंवा गुरु म्हणून पाहण्याची गरज नाही कारण त्याचे मनच त्याला योग्य दिशादर्शन करण्याचे काम करते.)

अभंग ७९८

*********************************************

🚩🚩संत निळोबा देखील माउलींबद्दल म्हणतात की...

*********************************************

संदेह गमला । रेडा कैसा बोलविला ।।

सांगा देव का न होती । निर्जिव चालविली भिंती ।।

कोरडे कागद । उदकी लागो नेदी बुंद ।।

निळा म्हणे बरा । द्यावा संतापायी थारा ।।

*********************************************

संत निळोबा म्हणतात की जेव्हा माऊलींनी रेडा बोलविला तेव्हाच त्यांच्याविषयीचा संदेह वाटला, म्हणजेच ते म्हणतात की माऊलींनी पहा कसा रेडा बोलवला, कसे त्याच्या मुखातून वेद बोलविले, त्यामुळे त्यांच्याविषयी संदेह वाटणार नाही का? म्हणजेच मनी त्यांच्याविषयी साशंकता निर्माण होणार नाही का मला सांगा? म्हणजे कोण सामान्य माणूस एखाद्या मुक्या जनावराला बोलता करू शकतो, ते म्हणतात एखाद्या रेड्याकडून वेद बोलवून घेणे हे मनात संशय निर्माण करणारे नाही का? एवढेच नव्हे तर कोण सामान्य माणसे भिंत चालवतात मला सांगा, ते म्हणतात भिंती सारखी निर्जीव वस्तू चालवणे ही काय साधी गोष्ट आहे का?

म्हणूनच ते म्हणतात की ह्यांच्या माणूसपणाचीच मला शंका येते किंबहुना असेच त्यांचे वर्तन आहे. म्हणजेच अशा या लोकांना देव का बरे बोलू नये मला सांगा? किंबहुना ते देवचं आहेत.

तसेच दुसरीकडे तुकोबांची गाथा उदकीं म्हणजेच पाण्यात तेरा दिवस राहिली आणि नंतर सहज वर आली आणि जेव्हा वर आली तेव्हा त्यास पाण्याचा एक थेंबही लागलेला नव्हता, त्यातील सर्व कागद अक्षरशः कोरडे होते, त्यावर ते म्हणतात मला सांगा हे शक्य तरी आहे का? हे असे कधी कोणी पूर्वी पाहिले किंवा ऐकले होते का?

परंतु ते म्हणतात जे आधी कधी घडले नव्हते ते घडले आणि लोकांनी ते याची देही याची डोळा पाहिले, म्हणूनच ते म्हणतात की अशांना सामान्य माणसे न म्हणता देवच लेखावे, किंवा तसे ते का लेखू नये? ते पुढे सर्वांना उद्देशून म्हणतात म्हणूनच येथे कोणीही संतांना देवापेक्षा कमी लेखू नये किंबहुना संतांना किंवा संत मंडळींना देवच मानून सर्वांनी त्यांच्या पायी थारा कसे मिळेल हेच पहावे.

अभंग ४१४३

*********************************************
🚩🚩रामेश्वर भट्ट देखील म्हणतात की देवात आणि तुकोबांमध्ये काहीही अंतर नाही, त्यांचे नाव देखील जरी कोणी घेतले किंवा गायले तरीही यमाला धाक बसतो किंबहुना तो थरथर कापू लागतो आणि नाम घेणाऱ्यांच्या सावलीला देखील उभा राहत नाही...
*********************************************

तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम ।।

ऐसा तुकोबा समर्थ । जेणे केला हा पुरुषार्थ ।।

जळी दगडासहित वहया । जैश्या तरियेल्या लाहया ।।

म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा । तुका विष्णू नोहे दुजा ।।

*********************************************

रामेश्वर भट्ट म्हणतात की 'तुकाराम तुकाराम' या नामाचा जरी उच्चार केला किंवा तुकाराम महाराजांच्या नामाचे जरी स्मरण केले तरी काळ म्हणजेच यम थरथर कापतो आणि लांब पळून जातो, ऐसे हे तुकोबा पूर्ण आणि खऱ्या अर्थाने समर्थ होते आणि मनुष्य जन्माला येऊन आणि मनुष्य जन्माचे सर्वोच्च ध्येय साध्य करून त्यांनी खरा पुरुषार्थ साधला. (येथे पुरुषार्थ करणे हे चार मुक्त्या साधणे हे आहे.)

ते पुढे म्हणतात जेव्हा गाथा उदकीं बुडविली, तेव्हा ती पुन्हा आपोआप व सहज वर येऊ नये म्हणून ती दगडाला बांधून बुडविण्यात आली होती, परंतु जेव्हा ती वर आली तेव्हा ती दगडासहितच वर आली हे मोठे आश्चर्य नव्हे काय? एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे पाण्यावर लाह्या सहज तरंगतात त्याप्रमाणे तुकोबांच्या वह्या म्हणजेच गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यावर दगडासहित तरंगल्या.

आणि म्हणूनच रामेश्वर भट्ट स्वतः द्विज म्हणजेच ब्राह्मण असून म्हणतात की तुकोबा आणि देवात पाहू गेल्यास काय अंतर आहे मला सांगा? किंबहुना तुकोबाराय आणि श्री हरी विष्णुत काहीही अंतर नाही, कोणताच भेद दिसत नाही, किंबहुना ते दोघे एकच आहेत असे म्हंटले तरी ते वाउगे ठरणार नाही.

*********************************************
मुक्तीचे चार प्रकारच्या आहेत.

१. सलोकता=इष्ट देवतेच्या लोकांत राहणे.

२. समीपता= इष्ट देवतेच्या नित्य सानिध्यात राहणे.

३. सरूपता = इष्ट देवतेचे रूप प्राप्त होणे.

४. सायुज्यता = ही चौथी मुक्ती असून शेवटची आहे. परमेश्वराशी किंवा आत्मरुपाशी एकरूप होऊन जाणे.

मुक्ती ह्या नेहमी जिवंतपणीच लाभतात आणि त्या लाभल्यानंतरच मरणानंतर मग मोक्ष लाभतो.


अधिक स्पष्टीकरणासाठी खालील लिंक वर क्लिक करावे...

अध्यात्म आणि विज्ञान यामधील फरक कसा समजावून सांगाल?