विज्ञान आणि अध्यात्म ह्यात फरक समजावून सांगण्यामागचा उद्देश असा आहे की बऱ्याच लोकांना विज्ञान अध्यात्मापेक्षा मोठे वाटते आणि जे काही विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही मग ते त्यांना एक तर चुकीचे वाटते नाहीतर खोटे वाटते, परंतु ते एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की विज्ञान ही गोष्ट प्राकृत आहे आणि अध्यात्म प्रकृतिपल्ल्याड आहे, त्यामुळे ते विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही आणि म्हणूनच जे जे काही विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही त्याचे आपल्याला आश्चर्य वाटते आणि तशी एखादी गोष्ट घडली की ती एकतर चमत्कार तरी वाटते नाहीतर खोटी तरी, परंतु दुसरीकडे पाण्याची वाफ झाली, वाफेचे ढग झाले आणि ढंगाचे पुन्हा पाणी झाले तर त्यात आश्चर्य नाही वाटत कारण ते विज्ञानाने सिद्ध केले आहे किंवा करून दाखवले आहे...
आणि म्हणूनच रेड्याने वेद कसे म्हंटले ह्याचे लोकांना आश्चर्य वाटते, कारण रेडा आधी बोललाच कसा ह्याचे त्यांना नवल वाटते, परंतु आपण माणसे बोलू शकतो ह्याचे त्यांना नवल वाटत नाही. परंतु आपण हे कुंडलिनीच्या उत्तरात पाहिले, कसे षडचक्रांच्या पटलांवर असलेले बिजचिन्हे उच्चारली जातात आणि कशी त्यांची परेंत आकृत्या तयार होतात, म्हणजेच जे कोणाला केव्हाही सांगता येणार नाही ते देवाने स्वतःच सांगून ठेवले आहे आणि हे आपण कुंडलिनीच्या उत्तरात वाचले आहे आणि मुख्य म्हणजे त्यातदेखील तुम्हांला कळून येईल की खुद्द कुंडलींनिसकट, ब्रह्मरंध्रद्वार(काकीमुख), षडचक्रे, परावाणीचे कुंड, इडा-पिंगला आणि सुषुम्ना ह्या गोष्टी दृश्य नाहीत, शरीरात शोधून सापडत नाहीत, पण म्ह्णून ते अस्तित्वातच नाहीत असे नाही, तरीदेखील शद्बाची निर्मिती होते आणि ते मुखावाटे बाहेर पडतात आणि कानाद्वारे ऐकू देखील येतात.
एवढेच नव्हे तर देवानेच योगासनांचा आणि मुद्रेचा मार्ग जगाला उघडा करून दिला, जेणेकरून ह्या मार्गांचा अवलंब करून मनुष्य दहाव्या द्वाराबाहेर असलेल्या परब्रह्मापर्यंत म्हणजेच त्याच्यापर्यंतची वाटचाल करू शकेल, त्याला प्राप्त करू शकेल, म्हणजे देवाने स्वतःहून स्वतःचे राहते ठिकाण दाखवून दिले आणि तेथे कसे पोचायचे हे देखील स्वतःच सांगितले, (म्हणजे देव जरी चराचरत असला तरीही त्याला प्राप्त करण्यासाठी मात्र काही विशिष्ट मार्गानेच प्रयत्न घ्यावे लागतात...असो) एवढेच नव्हे तर ज्या मनाला अजूनही विज्ञान मानत नाही, त्या मनाची देखील देवाने व्याख्या केली, मन देखील खऱ्या अर्थाने अस्तित्वात नाही परंतु शरीरात असलेल्या नऊ वायूंमध्ये जो 'दाब' निर्माण होतो त्यालाच 'मन' असे काल्पनिक नाव आहे आणि जोवर हा दाब कमी-अधिक होत राहतो आणि जितके त्याला रजोगुणाचे बळ मिळत जाते तितके त्याचे अस्थिरपण वाढत जाते आणि त्यामुळेच इच्छा, भीती वगैरे मनुष्याच्या ठायी निर्माण होतात, म्हणजेच जोवर हे वायू स्थिर होत नाहीत तोवर मन देखील काहीकेल्या स्थिर होत नाही, ते अस्थिरच राहते आणि हे नऊ वायुदेखील प्राणवायूचीच उपांगे असल्याने प्राणायाम करून वायू निरोधण करणे, त्यांच्या गती संथ ठेवणे हेच मनाला शांत आणि नियंत्रित करण्याचे अष्टांग-योगातील एक साधन आहे, आणि अशा ह्या मनाला स्थिर करण्यासाठी देवाने एकच नाही तर अनेक उपाय सांगितले आहेत, म्हणजे विज्ञानाला जेथे अजूनही मन नेमके कशाला संबोधितात हे सिद्ध करता आलेले नाही त्यावर देवाने 'मन म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती?' हे सांगून त्याला कसे नियंत्रित करावे त्याचे मार्ग देखील दाखवून दिले आहेत.
परंतु विज्ञानाने जरीही 'मन' सिद्ध केले नसले तरीही, त्याला शांत आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न मात्र सर्वचजण घेतात, त्याच्या होणाऱ्या सुख-दुःखाने गहिवरून जातात, मनाची अवस्था बिकट होऊन ते दिन आणि कष्टी झाले की त्याचा शरीरावर देखील परिणाम होतो आणि तो मात्र डोळ्यांना उघड दिसतो, त्यामुळे जरी मन हा कोणताही अवयव नसले तरीही शरीरात एवढी उलथापालथ घडवून आणते, परंतु 'मन असते' असे शास्त्रज्ञ काहीकेल्या मानत नाहीत. त्यातील बहुतेकजण मानवी मनाला Psyche म्हणून संबोधितात, त्यांना वाटते 'मन' म्हणजे आत्मा आणि बुद्धी ह्याचे मिश्रण आहे, पुन्हा येथे आत्मा आलाच, ते त्याची खालीलप्रमाणे व्याख्या करतात...
Psyche comes from the Greek psykhe, which means “the soul, mind, spirit, or invisible animating entity which occupies the physical body.”
अशारितीने तुम्ही गुगल केलेत तर तुम्हाला मनाच्या अगणित व्याख्या मिळतील.
असो.
म्हणजेच काय तर बहुतेक जण स्वतःला सोयीस्कररित्या हव्या ता गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि नको त्या गोष्टींना धुडकावून लावतात, परंतु ज्यांचा देवावर विश्वास नाही अशांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा की सर्व प्राणिमात्रांमध्ये आपल्यालाच का बुद्धी मिळाली? किंवा तसे पाहावयास गेलो तर कामापुरती बुद्धी सर्वांपाशीच असते, तर मग माणसाचीच का बरी चालते किंवा धावते? आणि त्यात देखील सर्वांची एकसमान का धावत नाही?, कोणाची वायूच्या वेगाने धावते तर कोणाची गोगलगायच्या चालीने? तर दुर्देवाने कोणाची ती देखील चालत नाही. आता येथे दुर्दैव आणि सुदैव म्हणजे तरी नेमके काय? ते नेमके कोठे आहे किंवा कशाला म्हणतात? नेमके ज्यावर बोट ठेवता येईल अशी ती एखादी वस्तू आहे का? असे बरेच प्रश्न एकमेकांतून तयार होतात ज्यांची विज्ञानाकडे उत्तरे नाहीत.
उदा. सर्वांना गोड गळा का नाही मिळाला? डोळ्यांमध्ये दृष्टी कशी काय आली? पक्षीच का उडतात? मनुष्यप्राणी जर एवढा हुशार आहे तर तो उडण्यावाचून कसा वंचित राहिला? आणि कोणी येथे जर असे म्हणेल की मनुष्याचे शरीर हे जड आहे त्यांनी हे लक्षात घ्यावे की आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जड विमाने उडायला लागलीच ना? आणि प्रकृतीसमोर कसले आले आहे जड आणि हलके, आपण सर्व तिच्यासमोर तर नगण्य आहोत, जोराच्या वाऱ्यासोबत किंवा वावटळीत आपण उडून जातोच ना? तेव्हा आपल्याला कोठे होते आश्चर्य? (…अय्या माणूस कसा काय उडाला? पण विमानांना उडुदे, ती काय उडतच असतात.. असो, मनुष्य उडत नाही कारण मनुष्याच्या शरीराची रचना उडण्यासाठी केलेली नाही, देवाने येथे प्राणिमात्राला त्यांची त्यांची वैशिष्ट्ये देऊ केली आहेत, ज्याप्रमाणे पक्षी उडतात, सापाला गरळ दिले आहे, तर मनुष्याला बुद्धी दिली आहे... हा देवाचा न्यायच आहे... आधीच मनुष्य अहंकाराने काय कमी उडतो?... असो.... )
आणि आता प्राण्यांच्यासोबत किंवा इतर गोष्टींबाबत तुलना राहूंदेत, येथे माणसामाणसात देखील किती भेद आहेत, मुख्य म्हणजे येथे दुसऱ्यांना जे जमते ते मला का नाही जमत? त्याला जे काही करता येते ते मी का नाही करू शकत? आणि ते देखील माझ्याकडे जे आहे त्याच्याकडे देखील तेच सर्वकाही असताना, निदान डोळ्यांना तरी तसेच दिसते, मग जे डोळ्यांना दिसत नाही असे नेमके दुसऱ्याकडे माझ्यापेक्षा वेगळे आहे तरी काय? म्हणजेच हे आणि असे बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे विज्ञानाच्या पलीकडली आहेत आणि ती जाणून घ्यायची असतील तर बुद्धीच्या पलीकडे जे आहे ते पाहावे लागेल, ज्याला संतमंडळी 'परे परते' असे म्हणतात (परा प्रकृतीच्या पलीकडले) आणि ते देवाच्या कृपेशिवाय कळू शकत नाही...
आणि म्हणून अध्यात्म आणि विज्ञान ह्यात फरक करण्यापेक्षा एक लक्षात घ्यावे की अध्यात्म हे ज्ञान असून विज्ञान ही एक पद्धत आहे, म्हणजे तेदेखील जरी ज्ञान असले तरीही ते इतर ज्ञानाचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी वापरले जाते, परंतु त्याला देखील मर्यादा आहे, कारण ते प्राकृत ज्ञान असल्याने म्हणजेच प्रकृतीपासून निर्माण झाल्यामुळे ते ह्या प्रकृती पर्यंतच मर्यादित राहते, त्याच्यापलीकडले त्याच्या आवाक्यात येत नाही... आणि देव हा प्रकृतीच्या पल्याड आहे...
म्हणजे समजा 'शून्य एकापेक्षा लहान आहे (०<१ )' हे ज्ञान झाले, परंतु हे ज्ञान खरे आहे की खोटे हे समजावून सांगण्यासाठी किंवा ते सिद्ध करण्यासाठी जसा गणितीय प्रमेयाचा आधार घ्यावा लागतो, त्यालाच 'विज्ञान' असे म्हणतात आणि ज्ञानेश्वरी वाचली असता तुम्हांला हे दिसून येईल की माऊलींनी सर्व ज्ञानेश्वरी गणितीय प्रमेय आणि विज्ञान ह्यांचाच आधार घेऊन स्पष्ट केली आहे, कारण देवानेच स्वतः ते मनुष्याच्या बुद्धीला पटेल असे सांगितले आहे, आणि तीच पद्धत पुढे मनुष्याने कोणत्याही ज्ञानाची सत्यासत्यता पडताळण्यासाठी वापरली, म्हणजे ती देखील माणसाने देवाकडूनच उचलली असे म्हंटले तरी वाउगे ठरणार नाही, आणि त्यामुळे माउली स्वतःच देवाला सर्व सिद्धांचा राव म्हणजेच सर्वात मोठा शास्त्रज्ञ किंवा सर्व शास्त्रज्ञांचा राजा म्हणून संबोधितात, कारण तो सर्वकाही सिद्ध करून दाखवतो...
संजयाची भूमि । सात्त्विक सुपीक । बीज निवडक । कृष्ण-वाक्य ।॥।१००८॥
म्हणोनि प्रमेय-। पिकाचा सुकाळ । होईल सकळ । श्रोतयांस ॥१००९॥
अहो श्रोते-जन । सकळ सज्जन । द्यावें अवधान । * अळुमाळ ॥१०१०॥
तेणें तुम्ही व्हाल । स्वानंदाचे धनी । लोटलें श्रवणीं । भाग्य आज ॥१०११॥
म्हणोनि दावील । विभूतींचा ठाव । सिद्धांचा तो राव । अर्जुनासी ॥१०१२॥
ती च कथा ऐका । धरोनियां भाव । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥१०१३॥
आणि जे स्पष्ट करता येत नाही तेथे समजून जावे की ते विज्ञानाच्या पलीकडले आहे, विज्ञानाच्या आवाक्यात ते येत नाही किंवा आटोक्यात बसत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते बुद्धीला पटू शकणार नाही, परंतु ते पटण्याच्या मार्गात मात्र विज्ञान आड येते, म्हणजेच दुसऱ्या शब्दात प्रकृती आड येते, आणि ह्या प्रकृतीलाच माया असे म्हणतात.
म्हणजे समजा, जर एखादी खूप मोठी संख्या गणितात मांडता येत नसेल किंवा गणिताने ती मोजता येत नसेल तर तिला आपण अनंत किंवा अमर्याद असे म्हणतो, ती अस्तित्त्वात नाही असे म्हणत नाही, म्हणजेच जी संख्या गणितीय आवाक्यात बसत नसेल तर तिचे अस्तित्व नाकारून अशी एखादी संख्या असूच शकत नाही असे मानले तर संकुचित विचार सरणीचे होईल, परंतु देवाच्या बाबतीत मात्र विज्ञान तसे करत नाही, त्याच्यासकट त्याचे अस्तित्व देखील धुडकावून लावते, कारण त्याचे अस्तित्व मान्य केले तर स्वतःचा मोठेपणा कसा सिद्ध होईल? कारण देवाचे अस्तित्व मान्य केले तर मनुष्याचा अहंकार दुखावेल, त्याच्या स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि आपण सर्व शोध लावण्याआधीच देवाने त्याची उत्तरे देऊन ठेवली आहेत हे स्वीकारणे तर मग अवघडच होऊन जाईल, मग मनुष्याचे कर्तृत्व देखील धोक्यात येईल, त्याला काही कामच उरणार नाही, त्यामुळे ह्यावर तर चर्चाच करायला नको, आणि म्ह्णूनच कधी कधी असे वाटते की हे सर्व मनुष्याच्या स्वार्थामधून तर निपजले नाही ना?
असो, आणि म्हणूनच विज्ञान जर स्वतःला ज्ञान म्हणवत असेल तर ज्ञान असे असावे जे व्यापक असेल, सर्वांठायी व्यापक दृष्टिकोन तयार करण्यास मदत करेल, मनुष्याला एकदेशी / संकुचित विचार करण्यापासून आळा घालेल, परंतु विज्ञानाने जर नेमके उलट होणार असेल तर त्या विज्ञानाचा काय फायदा? म्हणजे एखादी गोष्ट मोजता येत नाही किंवा जे बुद्धीला आकळत नाही किंवा सिद्ध करता येत नाही, तर त्यापुढे नतमस्तक होण्याऐवजी ते ज्ञानच खोडून काढणे म्हणजे स्वतःची प्रगती थांबवण्यासारखे होईल, स्वतःला एखाद्या चौकटीतच बांधून ठेवण्यासारखे होईल, जी बुद्धी कल्पनेचा विलास आणि विकास करू शकते, त्या जोरावर मनुष्य सहसा बुद्धिग्राह्य नसलेले अस्तित्वात आणू शकतो तिला मग तुम्ही याठिकाणीच का संकुचित करत आहात?
ज्याप्रमाणे एखाद्या खेळात आपण स्वतः नाही जिंकलो तर दुसऱ्याला देखील जिंकू नाही द्यायचे हे जसे खिलाडू वृत्तीचे ठरत नाही येथे देखील अगदी तसेच आहे. वैज्ञानिकांनी स्वतःशी असे ठरविले पाहिजे की ह्या अशा गोष्टी मोजण्यासाठी आपण कमी पडत आहोत, त्यांचे मोजमाप करण्यासाठी आपल्याकडील मापे तोकडी पडत आहेत, म्हणजेच त्रुटी आपल्यापाशी आहे, आपण नवीन यंत्रणा शोधून काढावयास हवी, नवीन संकल्पना तयार करावयास हवी, असा मनाचा मोठेपणा हवा, परंतु त्याऐवजी ते ज्ञानच धुडकावून लावणे शहाणपणाचे नव्हे.
आणि जे मोजता येत नसेल किंवा बुद्धीला आकळत नसेल ते जर मान्यच करायचे नाही असे ठरविले तर कोणी प्रेमासारख्या गोष्टीवर देखील विश्वास ठेवू नये, कारण प्रेम तर अशी गोष्ट आहे जी सहसा आकलनापलीकडली आहे, प्रेम म्हणजे काय हे देखील कोणाला सांगता येत नाही आणि वर प्रेमात अशी कोणती रासायनिक क्रिया होते जी मनुष्याची बुद्धी भ्रष्ट करून टाकते जेणेंकरून धडधाकट माणूस मग वेडाच होतो, त्याच्या नसलेल्या मनावर परिणाम होतो, तो नको नको त्या गोष्टी करावयास लागतो, आणि एरव्ही ज्या गोष्टींवर तो विश्वास ठेवत नाही मग अशावेळी त्याला देवावर देखील विश्वास ठेवावासा वाटतो, त्याला सर्व अलौकिक आणि अमूर्त गोष्टी अचानक दिसावयास लागतात, अशा ह्या प्रेमाची तर गोष्टच और आहे, आणि त्यात आईचे प्रेम तर सर्वात आकलनापलीकडले असते, परंतु येथे कोणीही असे बोलताना दिसत नाही की प्रेम ही गोष्टच अस्तित्वात नाही, आणि म्हणाले तरीही ते फक्त दाखवण्यापुरते आणि वरवरचे असते, मनातून तर ते सर्वाना हवेहवेसेच वाटते, उलट सगळ्यांना येथे अमर्याद, निस्सीम (सीमा नसलेले), बिनशर्त प्रेम हवे असते, कोणी प्रेम करणाऱ्या व्यक्तीला असे नाही म्हणत तुझे प्रेम अमर्याद आहे, निस्सीम आहे, त्यामुळे ते मोजता येत नाही, आणि म्हणून ते विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही आणि बुध्दीलाही आकळत नाही, त्यामुळे तूझे माझ्यावरचे प्रेम खोटे आहे...
उलट संतमंडळीचा दृष्टिकोन तर अशा ह्या वैज्ञानिकांपेक्षा खूपच उच्च म्हणावयास हरकत नाही, ते केवळ देवावर विश्वासच नाही ठेवत तर त्याचे, त्याच्या अस्तित्वाचे देखील मोजमाप करावयास जातात, त्याच्या ज्ञात नसलेल्या स्वरूपाला देखील शब्दात मांडायचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी स्वतःच नवनवीन मापे शोधून काढतात, वैज्ञानिकांसारखे रडत नाही बसत आणि गोष्टी धुडकावून तर अजिबात नाही लावत...आणि संतमंडळी देखील आधी सर्वसामान्यच माणसे होती, त्यांनी फक्त देवावर दृढ विश्वास ठेवला आणि म्हणूनच ते चौकटीच्या बाहेर गेली आणि इतरांपासून वेगळा विचार करावयास लागली..
तुकोबा जेव्हा देवाचे स्वरूप मोजण्याचा प्रयत्न करतात आणि ते न मोजता आल्याने म्हणतात...
मनवाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ति केले ।।
भक्तीचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्वता न मोजवे ।।
योग याग तपे देहाचिया योगे । ज्ञानाचिया लागे न सापडसी ।।
तुका म्हणे आम्ही भोळ्याभावे सेवा । घ्यावी जी केशवा करितो ऐसी ।।
================
तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला, हे नारायणा तुझे स्वरूप हे काया, वाचा आणि मन या तत्वांच्या पलीकडले आहे, तुला या तीन साधनांनी कोणीही मोजू शकत नाही आणि म्हणूनच तुझे हे अनाकलनीय स्वरूप मोजण्यासाठी, जाणून घेण्यासाठी मी भक्तीचेच माप केले आहे. कारण इतर कोणत्याही उपायांनी किंवा साधनांनी तुझे मोजमाप होऊ शकत नाही किंबहुना त्याचा साधा थांगपत्ता सुद्धा लागत नाही.
ते म्हणतात कोणीही येथे कितीही योगसाधना केल्या, कितीही तपे आचरलीत किंवा कितीही ज्ञान अर्जित केले तरीही तुझे स्वरूप, तुझी महती, तुझा थोरपणा या उपयांनी / या मार्गांनी जाणता येत नाही किंबहुना तू ह्या कोणत्याही साधनांच्या हाती लागत नाहीस.
तुकोबाराय शेवटी म्हणतात आणि म्हणूनच आमचा अहंकार आता आम्ही सांडून देऊन, त्याचा त्याग करून ज्या भोळ्याभावाने आम्ही तुझी सेवा करतो आहोत, भक्ती करत आहोत ती तू आता गोड मानून घ्यावीस, त्याचा आनंदाने स्वीकार करावा.
================
हे तर फक्त झाले विज्ञानच्या एका गणितीय शाखेचे उदाहरण, सर्व शाखांचे पाहू गेल्यास अशी बरीच उदाहरणे सापडतील... आणि म्हणूनच प्रत्येकाने विज्ञानाची चौकट मोडावी आणि त्याबाहेर पाऊल ठेवावे... कारण त्यापुढचे मग देवच सर्वांना जातीने शिकवतो...
तुकाराम महाराज तर म्हणतात जे 'परे परते' आहे, म्हणजेच परा प्रकृतीच्या पलीकडले आहे ते आम्हांला आता सांगावे आणि शिकवावे लागत नाही, कारण देवच आम्हांला ते शिकवतो, तेथील गूढ तोच आम्हांला सांगतो, त्यामुळे ते मला आपोआपच कळते आणि त्यामुळे मीदेखील ते तुमच्यापुढे सहज मांडू शकतो...
परे परते मज न लगे सांगावे । हे तो देवे बरे शिकविले ।।
दुसऱ्याते आम्ही नाही आतळत । जाणोनि संकेत उभा असे ।।
तरीही ज्ञान आणि विज्ञान ह्यांतील फरक आपण देवाच्या मुखातूनच ऐकूयात...परंतु त्याआधी मन म्हणजे काय ते पाहुयात...
सांगितलीं ऐसीं । इंद्रियें दहा हि। आतां “मन तें हि। स्पष्ट सांगूं ॥॥ १६६
इंद्रियां-बुद्धीच्या । संधींत जें फिरे। रजोगुणाधारें। चंचलत्वें ॥१६७॥
मृगजळावरी । भासती लहरी । नातरी अंबरीं । नील-वर्ण ॥१६८॥
तेसा देहीं भासे । जयाचा आभास । नाहीं च जयास । "वास्तवता ॥१६९॥।
रज आणि रेत । होवोनियां एक। पंचभूतात्मक । देह घडे ॥१७०॥
मग वायु तत्त्व। एक चि तें देहीं । * दशविध होई । स्थान-भेदें ॥१७१॥
देह-धर्म बळें। मग ते दहा हि। आपुलाल्या ठायीं । *निवसतां ॥१७२॥
तेथ चांचल्य तें । एकलें चि राही । म्हणोनिया घेई । " रजोबळ ॥१७३॥
बुद्धीच्या बाहेरी । अहंकारावरी । थोर बळ धरी । माझारीं च ॥१७४॥
वायां तयालागीं । मन ऐसें नांव । तें तों * सावयव । कल्पना च ॥१७५॥
भगवान श्री कृष्ण मग पुढे म्हणतात की अशाप्रकारे शरीराच्याठायी असलेल्या बुद्धी आणि इंद्रिये ह्यांच्या संधीत म्हणजेच फटीत जे फिरते आणि शरीराच्याठायी असलेल्या रजोगुणाच्या आधारे ज्याला मग चंचलत्व प्राप्त होते आणि ज्याप्रमाणे मृगजळावर तरंगांचा भास निर्माण व्हावा किंवा आकाशी नीलवर्णाचा जसा आभास व्हावा त्याप्रमाणेच देही ज्याचा आभास होतो परंतु ज्यास किंचितदेखील वास्तवता नाही म्हणजेच वास्तवात जे अस्तित्वातच नाही... म्हणजेच असा हा पंचमहाभूतात्मक देह जेव्हा रजोगुण(धुळीचे कण) आणि रेत(माती) एकत्र येऊन बनण्यास सुरुवात होते आणि मग त्याच देहात जेव्हा वायुतत्व अवतरण्यास सुरुवात होते, आणि असा हा वायू जरी मग एकच असला तरीही त्याच्या शरीरातील विविध स्थानभेदामुळे मग तो दशविध होतो म्हणजेच दहाप्रकारचा होतो (उदाहरणार्थ नाकावाटे आल्याने तो प्राणवायू होतो तर गुदवाटेने आल्याने अपान म्हणजेच पादवायू होतो, हाडातील वायूला आपण वात असे म्हणतो वगैरे...)अशाप्रकारे हा वायू मग देहधर्म सुरु झाल्यावर आपापल्या जागेवर व्यवस्थित निवास करतो, परंतु त्यामुळे हा दोन वायूंच्या मध्ये मग साहजिकच एक चंचलता निर्माण होते (ज्याप्रमाणे दोन ठिकाणाहून आलेल्या हवेमुळे जसे त्यांच्यामध्ये हवेचा दाब तयार होतो आणि मग तो मागे-पूढे सरकत राहतो, त्या दाबालाच चंचलता असे म्हणतात), त्या चंचलतेमुळेच शरीराच्याठायी रजोगुण बळावयास सुरुवात होते आणि असे हे रजोबळ मग बुद्धीच्या बाहेर जाऊन अहंकारावरही चढू लागते आणि असे हे थोर बळ मग शरीराच्या भीतरीच जोर धरू लागते आणि अशा ह्या बळाला, म्हणजेच अशा ह्या चंचलतेलाच, म्हणजेच अशा ह्या दोन वायूंच्या मधील चढत्यावाढत्या दाबालाचा 'मन' असे म्हणतात आणि म्हणूनच ते एक अवयव आहे ही शेवटी एक कल्पनाच आहे. म्हणजे त्या चंचलतेला आपण वायाच मन असे म्हणतो, त्याला अवयव देखील मानू लागतो परंतु ही सर्व एक आपली कल्पनाच आहे.
जयाचिया संगें । ब्रह्मालागीं साच । आली नसती च । जीवदशा ॥१७६॥
सर्व प्रकृतीचे । असे जें का मूळ । वासनेसी बळ । मिळे जेणें ॥१७७॥
अहंकारालागीं । द्यावयासी भर । राहे निरंतर । तत्पर जें ॥१७८॥
वाढवी इच्छेतें। चढवी आशेतें। आधार जें देतें। भयालागीं ॥१७९॥
जेणें चढे बळ। अविद्येलागोन । होय जन्म-स्थान । द्वैताचें जें ॥१८०॥
जें का इंद्रियांसी । लोटी विषयांत । रची मनोरथ । सवें मोडी ॥१८१॥
संकल्प-विकल्पें । अखंड * उदंड । करी घडामोड । सृष्टीची जें ॥१८२॥
जेणें बंद केलें । बुद्धीचे हि द्वार । भ्रांतीचें कोठार । होय जें का ॥१८३॥
वायु-तत्त्वाचिया । आंतील जें सार। तें चि गा साचार । मन जाण ॥ १८४॥
भगवान श्री कृष्ण मग पुढे म्हणतात की अशाप्रकारे ज्याच्या संगतीने म्हणजेच जे जर नसते तर ब्रह्मदेवालाही जीवदशा प्राप्त झाली नसती म्हणजेच ब्रह्मदेवाचादेखील कधी जन्म झाला नसता, एवढेच नव्हे तर सर्व प्रकृतीचेच जे खऱ्या अर्थाने मूळ आहे आणि जीवाच्याठायी असलेल्या वासनेला ज्याच्यामुळे मग बळ देखील मिळते आणि वर शरीराच्याठायी असलेल्या अहंकाराला जे निरंतर भर देण्यास सदैव तत्पर असते, तसेच जे इच्छेला वाढवते आणि आशेला नित्य चढवत नेते आणि जे भयाला देखील आधार देते, तसेच ज्याच्यामुळे मग अविद्येलादेखील बळ मिळते आणि जे द्वैताचे जन्मस्थानच मानले जाते, म्हणजेच ज्याठिकाणी द्वैतभावनेचा पहिल्यांदा जन्म होतो, तसेच जे इंद्रियांना विषयांत लोटते आणि त्यासोबत अनेक मनोरथ रचते आणि मोडते (म्हणजेच क्षणाक्षणाला नवनवीन कल्पना रचते आणि मोडते), ते पुढे म्हणतात एवढेच नव्हे तर उदंड असे संकल्प-विकल्प जन्माला घालून ह्या सृष्टीची घडामोड करण्यासदेखील जे कधी मागेपुढे पाहत नाही, जे स्वतःच्या जोरावर मग बुद्धीचे द्वार देखील बंद करून भ्रांतीला म्हणजेच भ्रमाला राहण्यास स्वतःच कोठार/घर होते, अशा ह्या वायुतत्वाच्या आतील साराला, म्हणजेच दोन वायूंच्या मधील चंचलेतला किंवा दाबाला आपण हे धनंजया 'मन' असे म्हणतो.
क्रमशः