(संदर्भ: देवाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या तुकोबांची व्यथा...)
कान्हया रे जगजेठी । देई भेटी
एक वेळे ।।
काय मोकलिले वनी । सावजांनी
वेढियेलें ।।
येथवरी होता संग । अंगे अंग
लपविले ।।
तुका म्हणे पाहिले मागे । एवढ्या वेगीं
अंतरला ।।
तुकाराम महाराज म्हणतात हे कान्हा, हे जगजेठी आता कृपा करून यापुढे तरी उशीर लावू नकोस, विलंब करू नकोस, त्वरेने धावत ये आणि मला भेटी दे, आता तरी मला तुझ्या चरणकमळांचे दर्शन घडू देत. तुझ्या सुकुमार आणि गोजिऱ्या पायांना डोळे भरून पाहू देत.
ते म्हणतात आता यापुढे मी तुझ्याशीवे राहू शकत नाही, तुझ्यावाचून एकक्षण देखील जगू शकत नाही, तेव्हा किमान एकवेळ तरी मला येऊ आलिंगन दे आणि या डोळ्यांना तुझ्या श्रीमुख दाखव. आणि असे करून मला या संसार-पाशातून तू एकदाचे मुक्त कर.
कारण ते म्हणतात तू मला या संसाररूपी वनात टाकून काय दिलेस, काहीकाळ एकटे काय सोडलेस, लागलीच या संसारच्या अधीन गेलो आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार रुपी सावजांनी मला वेढले आणि माझा घातच ओढवला.
म्हणजे मी लागलीच त्यांना शरण जाऊन पुनः पूर्वी सारखा वागू लागलो, नको-नको ती कर्मे आचरू लागलो, करू नये तेच नेमके करू लागलो आणि पुनः या प्रपंचाच्या आहारी जाऊ लागलो.
तुकोबा म्हणतात जोवर तू माझ्या संगतीला होतास, माझ्या सोबत होतास, म्हणजेच जोवर तुझे नाम माझ्या मुखी होते, माझ्या कंठी होते, तोवर मी आणि तू एकच होतो, एकरूप होतो, तुझ्या अंगी मी माझ्या स्वतःला लपवून होतो. आणि मला तुझ्या अखंड अंगसंग लाभला होता.
परंतु तुझे नाम जसे माझ्या मुखातून सुटले वा निसटले, मी क्षणांत तुझ्यापासून लांब झालो आणि दूर फेकलो गेलो. आणि तू देखील मला स्वतःपासून वेगळे होऊ दिलेस आणि आपला अंगसंग तुटला.
आणि एवढेच नव्हे तर थोड्या अवधीतच तू मला एवढा वेगाने अंतरलास की मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा तू दिसेनासाच झालास, कोठे सापडेनासाच झालास. तू मला इतक्या वेगाने अंतरलास की तुझ्या असण्याच्या खुणा देखील आता नाहीशा झाल्या आहेत.