मनुष्य जन्माला का येतो? मनुष्य जन्माला येण्यामागचे मूळ कारण कोणते?

मनुष्य जन्माला का येतो? मनुष्य जन्माला येण्यामागचे मूळ कारण कोणते?

(संदर्भ: भोग भोगणे का येते ? मनुष्याच्या वाट्याला दुःखे का येतात? संकटे का येतात?)

तुकोबांचे अभंग

मनुष्य जन्माला येतो ते त्याच्या प्रारब्धमुळे. त्याच्या संचीतामुळे आणि त्याद्वारे त्याने आचरलेल्या कर्मांचे भोग भोगण्यासाठी.

म्हणजेच मनुष्य जन्मालाच येतो ते मुळात भोग भोगण्यासाठी.

तुकोबा म्हणतात जन्म घ्यावा लागणे किंवा जन्माला येणे हेच मनुष्याने केलेल्या पापाचे किंवा पातकाचे मूळ असून जन्माला येण्याचे घडणे हे आपल्या संचिताचेच फळ असते हे प्रत्येकाने येथे लक्षात घ्यावे.

तुकोबा पुढील अभंगात म्हणतात...

🌼🌼🌼🌼

जन्मा येणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ

आपुलिया ।।

मग वायावीण दुःख वाहू नये । रुसोनीयां काय

देवावरी ।।

ठाऊकाची आहे संसार दुःखाचा । चित्ती सीण याचा

वाहू नये ।।

तुका म्हणे त्याचे नाव आठवावे । तेणे विसरावे

जन्मदुःख ।।

🌼🌼🌼🌼

ते पुढे म्हणतात त्यामुळे ह्या संसारात येऊन पदरी येणाऱ्या दुःखकष्टांचे येथे कोणीही मनी व्यर्थ दुःख वाहू नये व चित्ती त्याचा खेद करत बसू नये.

म्हणजे चांगले भोग भोगताना गहिवरून जाऊ नये तर वाईट भोगांचे व्यर्थ दुःख वाहू नये, त्याचा त्रागा करत बसू नये आणि इतरांवर तर सोडाच परंतु त्याने देवावर देखील त्याचा राग काढू नये.

कारण ते म्हणतात देवावर रुसून काय होणार? त्याने कोणता लाभ पदरी येणार?

उलट अशा ह्या कठीण काळात तोच एकमेव सहाय्यकर्ता असून तोच या सर्वातून सोडवणूक देखील करू शकतो हे लक्षात ठेवून त्याची सदैव आठवण ठेवावी. त्याचे सदासर्वकाळ चिंतन करावे. त्याचे नित्य स्मरण असू द्यावे.

आणि मुख्य म्हणजे त्याला जीवेभावे शरण जावे, त्याची कास धरावी, त्याला साकडे घालावे. आणि त्याची सोय धरावी.

कारण मनुष्याला त्याच्या कठीण प्रारब्धातून जर कोणी बाहेर काढू शकतो, त्याची असह्य अशा भोगांतून जर कोणी सहीसलामत सुटका करू शकतो आणि तोवर आलेले भोग सुसह्यदेखील करू शकतो तर तो एकमेव श्री हरिच असून त्याला कधी चुकूनही कोणी विन्मुख होऊ नये.

उलट त्याला विन्मुख होणे म्हणजे अधिकच्या संकटांना निमंत्रण देण्यासारखेच असते हे लक्षात घेऊन जितके शक्य तितक्या लवकर त्याचे चरण धरावेत व त्याच्या अधीन जावे.

ते पुढे म्हणतात कारण हा संसार मुळातच दुःखाचा असतो, कष्टप्रद असतो हे सर्वांना येथे आपसूकच ठाऊक असते, त्यामुळे कोणीही चित्तात त्याविषयी व्यर्थ सीण वाहू नये.

तुकोबा शेवटी म्हणतात उलट अशावेळी देवाला विन्मुख होण्याऐवजी त्याला सर्वभावे शरण जावे, त्याची कास घट्ट धरावी, त्याचे पाय दृढ धरून ठेवावेत, त्याची आठवण ठेवावी, त्याचे नाम गावे, जेणेकरून मनुष्य मग त्याच्या उभ्या जन्माचेच दुःख विसरतो.

म्हणजेच केवळ रोजच्या जीवनातीलच नव्हे तर संपूर्ण जन्माच्याच दुःखातून त्याची सुटका होऊन त्याचे जन्ममरणाचेच दुःख शेवटी कायमचे संपुष्टात येते आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची एकदाची सुटका होते.

म्हणजेच या सर्वांपासून कशी सुटका करून घेता येईल याचा विचार अधिक करावा व अंती स्वतःचे हीत साधुन घ्यावे.

अभंग २०९९

तुकाराम महाराज म्हणतात आणि एकदा का हा मनुष्यजन्म सरला की पुढे जाऊन पुन्हा नरदेह लाभेल आणि त्याद्वारे भोगलेले सुखदुःखे आठवतील किंवा आठवणींच्या मार्फत पुन्हा त्यांचा उपभोग घेता येईल असे जर कोणास वाटत असेल तर ते कदापि शक्य नाही. आणि वर कितीही प्रयत्नाने ते घडूनही येणार नाही. आणि मुख्य म्हणजे हे सर्वांना आपसूकच ठाऊक असूनही लोकं येथे का डोळेझाक करतात हे मला कळत नाही.

आणि म्हणूनच ते सर्वांना विचारतात की तुम्ही सर्वजण हे अनायासे जाणून असूनही तुम्ही त्याप्रती का बरे अंध होत आहात? ठाऊक नसल्याचा आव का आणत आहात? आणि अंध नसूनही का आंधळ्यासारखे वागत आहात? मनुष्यजन्माचे मोल काय आहे आणि असते हे खरेच कोणास येथे ठाऊक नाही काय? हे कुणी स्वप्नातही जाणत नाही का?

ते अभंगात म्हणतात...

🌼🌼🌼🌼

मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी ।

हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ।।

लक्ष चौर्‍यांशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा ।

येउनि पडसी संदेहपुरा । वोळसा थोर मायाजाळीं ।।

पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती ।

कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ।।

नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती ।

होईन देव चि म्हणती ते होती । तरि कां चित्ती न धरावें ।।

क्षण एक मन स्थिर करूनी । साव होई डोळे उघडोनी ।

पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ।।

🌼🌼🌼🌼

कारण ते म्हणतात जीवाला येथे केवळ मनुष्यजन्मच लाभत नाही, तर त्यास चौर्‍यांशीलक्ष योनीतून फिरावे लागते व ते काही केल्या चुकवता येत नाहीत. तसेच अशा या गर्भवासाच्या फेऱ्यात यातना देखील थोर भोगाव्या लागतात.

एवढेच नव्हे तर शेवटी जीवाला आपण जन्माला का आलो? आपल्या जन्माचे प्रयोजन काय? हेच त्याला आठवेनासे होते. तो संदेह पुरात वाहवत जातो व एकवेळ अशी येते की तो संदेहाच्या खोल गर्तेत जाऊन अडकतो व त्या गर्तेत खोल रुतत जातो व त्यात भर म्हणून की काय पुढे मायाजाळाचा जो वळसा लागतो तो संपता संपत नाही.

आणि शेवटी या सर्वातुन बाहेर पडणे मग जीवाला अशक्य होऊन बसते. कठीण होऊन जाते. व दिवसेंदिवस तो अधिकच नाडला जाऊ लागतो आणि भयंकर अशा भोगांचा त्याला सामना करावा लागतो.

कारण महाराज म्हणतात एकदा का जीव पशुयोनीला गेला की सर्वच संपले म्हणून समजावे. कारण पशुपक्षी पुण्यपाप जाणतात का? त्यांना त्याचे ज्ञान असते का? म्हणजेच पशुपक्ष्यांना पुण्यपापाचे भान नसते. ते दोहोंतील अंतर जाणत नाही. त्यामुळे कर्मे असताना आपण पाप करतो आहोत की पुण्य हे त्यांच्या गावी देखील नसते.

तसेच मनुष्ययोनीला उत्तम, मध्यम, कनिष्ठ प्रकारचे भोग असून ते नानाविध भोग भोगतात किंबहुना अशाप्रकारचे काही भोग असतात हेदेखील त्यांस ठाऊक नसते. हे ते केव्हाच जाणू शकत काही. उलट त्यांची दशा अधिकच वाईट असते. त्यांतील काही तर उपजतच मरतात, तर अन्य जन्माला येताच बहिरी, आंधळी, मुकी पांगळी असतात. व त्यात वाईटाहून वाईट भोग त्यांच्या नशिबी येतात. ज्यामुळे जिवाला मग अधोगतीच लाभत जाते. उर्ध्व उजू गतीची तेथे शक्यताच उरत नाही.

तेव्हा नरदेह लाभलेल्यांनी आता एक कायम ध्यानी ठेवावे की तरून जाण्यास दुर्घट अशा भवसिंधुतून सुटण्याचा एक उत्तम मार्गच ह्या निमित्ताने त्यांच्या हाती लागला आहे. अनायासे नरदेहासारखे उत्तम निधान त्यांच्या हाती आले असून पुढे उत्तम गती मिळवून देण्याचे देखील ते एक साधन आहे हे जाणावे.

एवढेच नव्हे तर सर्व योनींचे हे सार असून या साधनाद्वारे मनुष्याला जे हवे ते साध्य करता येते, हवा असलेला लाभ पदरी पाडून घेता येतो हे लक्षात घ्यावे. हे कमी म्हणून की काय ज्यांना आपण देव व्हावे असे वाटत असेल किंवा तशी इच्छा जर मनी असेल तर त्यास देवही होता येते, त्याच्या योग्यतेलाही पोचता येते व ब्रह्मानंद पदरी पाडून घेता येतो. एवढ्या ह्या नरदेहाची महती असून ती वाया घालवणे म्हणजे मुर्खपणाचे आहे हे लक्षात घ्यावे.

त्यामुळे आता तरी तुम्ही मनावर घ्यावे व नरदेहाचे सर्वोच्च हित साधून अंती आपला उद्धार करून घ्यावा. म्हणजेच यापुढे हे एकच तुमच्या चित्ताने घ्यावे व हेच ध्येय तुम्ही तुमच्या उराशी बाळगावे.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता एकक्षण मन स्थिर करून सावधान व्हावे, व डोळे व कान उघडून नीट पहावे की वेदपुराणे देखील काय बोलतात? त्यांनी देखील काय सांगून ठेवले आहे?. नरदेहाविषयी त्यांचे काय म्हणणे आहे?

म्हणजेच ते सर्व देखील हेच सांगतात आणि हेच सूचित करतात. त्यामुळे निदान आता तरी तुम्ही सर्वांनी नरदेहाचा योग्य तो वापर करून घ्यावा व आपले हित साधून अंती स्वतःचा उद्धार करून घ्यावा, अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. हवे असल्यास मी तशी तुम्हाला गळच घालतो.

अभंग ४१०४

तुकाराम महाराज म्हणतात असा सर्वेंद्रियांनी संपन्न असलेला मनुष्यदेह आपल्या सर्वांना सुदैवाने लाभला असून यापुढे आपण तो स्वबळावर पुन्हा मिळवू म्हंटले तरीही तो आपण पुनरुपी प्राप्त करू शकत नाही, कारण एवढी सत्ता, एवढे स्वातंत्र्यच आपल्यापाशी नाही.

आणि म्हणूनच अनायासे जी संधी सर्वाना येथे लाभली आहे, स्वतःहून चालून आली आहे, तिचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा आणि प्रेमाने किंबहुना आवडीने हरिनाम गावे.

ते अभंगात म्हणतात...

🌼🌼🌼🌼

ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता

स्वतंत्र ।।

म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें

आवडी ।।

संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें

क्रियमाण ।।

तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसें

सुकराचे ।।

🌼🌼🌼🌼

ते पुढे म्हणतात कारण प्रत्येकजण स्वतःसोबत 'संचित' आणि 'प्रारब्ध' घेऊन येतात आणि वर ती एवढी बळकट असतात, एवढी गाढी असतात की त्यासमोर कोणाचेही काहीही चालत नाही आणि त्यात भर म्हणजेच क्रियमाणाची धाव पुढे असतेच, म्हणजे प्रत्येकजण दैनंदिन कर्माने त्यात नवीन कर्मे(क्रियमाण) जोडतच असतो आणि 'क्रियमाण ' हे संचितात अधिकची भर टाकत असतात.

तुकोबाराय शेवटी म्हणतात आणि म्हणूनच मनुष्याला ज्याच्या-त्याच्या कर्मानुसार, म्हणजेच जेवढे त्याचे प्रारब्ध गाढ असेल त्यानुसार घुबडासारखे व डुकरासारखे जन्म घ्यावे लागतात किंवा प्राप्त होतात आणि त्याद्वारे अतिहीन भोग भोगावे लागतात.

अभंग ५१२

#प्रारब्ध #संचित #कर्म #नशीब #पूर्वकर्म #shritukaramgataha #श्रीतुकाराममहाराजांचीसार्थगाथा