प्रणव हा शब्द पुराणांमध्ये खूपवेळा वापरला जातो. त्याचा नेमका अर्थ काय आहे?

प्रणव म्हणजेच ॐकार किंवा , हे ब्रह्मनाम आहे, म्हणेजच ब्रह्माचे / परब्रह्माचे नाव आहे, जसे श्री, हरी, विठ्ठल, नारायण, पांडुरंग ही परब्रह्माची म्हणेजच देवाची सगुणरूपाची नामें आहेत तसेच ॐकार हे निर्गुण रूपाचे नाव आहे. 
 

 
 
हा बीजमंत्र देखील आहे(जो मंत्र आपल्याला आपल्या बीजाकडे किंवा उत्पत्तीकडे घेऊन जातो तो बीजमंत्र), फक्त इतर नामांत आणि ह्यात असा फरक आहे की ॐ हे नामदेखील आहे आणि मंत्रदेखील आणि सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा मंत्र आहे.

हा मंत्र कर्मे करताना किंबहुना सात्विक कर्मे करताना म्हणावा किंवा हे नाम उच्चारावे जेणेकरून केलेली कर्मे ब्रह्मार्पण होतात म्हणजेच देवाला अर्पण केली जातात. 
'कर्मे देवाला अर्पण करणे' म्हणजे केलेले कर्म आपण केलेले नसून देवाने केले आहे किंवा त्याने ते आपल्याकडून करवूनन घेतले आहे असा भाव असणे, आणि ही श्रद्धा जेव्हा बळ धरते तेव्हाच हातून मग निष्काम कर्मे घडतात, म्हणजेच केलेल्या कर्माच्या फळभोगातून मनुष्याची सुटका होत जाते आणि शेवटी त्याला जन्म-मरणातूनच मुक्ती मिळते.

परंतु तसे न करता त्याने केलेल्या कर्माचे कर्तेपण जर स्वतःकडे घेतले आणि कर्तृत्वाचा अभिमान बाळगला आणि तो मिरवला तर केलेली सर्व सात्विक कर्मे दोषयुक्त ठरतात आणि त्याची फळे देखील मग भोगावयास लागतात. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे हातून धर्म घडून देखील शेवटी तो अधर्मच म्हणून वाखाणला जातो.
तेव्हा हा मंत्र किंवा हे ब्रह्मनाम सात्विक कर्मे करताना कसा वापरावा हे भगवान श्री कृष्णाने ज्ञानेश्वरीत १७ अध्याव्यात शेवटी भगवान श्री कृष्णाने सांगितले आहे.

अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय १७...श्रद्धा-त्रय-विभाग-योग

भगवान श्री कृष्ण जेव्हा अर्जुनाला यज्ञतपदान आदी सर्व सात्विक क्रियांचे महत्व सांगून त्या कशा मोक्षदायी होतात ते सांगताना 'ॐ तत् सत्' म्हणजे काय हेदेखील गूढ उकलतात.
 




(1)भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुझ्याठायी मग जे शुद्धसत्त्वगुण राहतील त्यांनीच मग हे धनंजया आतापर्यंत सांगितलेल्या सर्व यज्ञादिक क्रिया तू कर जेणेकरून त्या योगाने तुला मग आपोआपच स्वतःचे स्वरूप स्पष्टपणे दिसावयास लागेल किंवा दिसेल. ते म्हणतात सूर्य दाखवताच म्हणजेच उगवताच या चराचरात मग कोणता पदार्थ दिसत नाही ते सांग बरे? त्याप्रमाणेच सत्त्वगुणाधारे वर्तु जाता किंवा कर्मे केली असता कोणते कार्य फलद्रूप होणार नाही सांग बाबा रे?
ते पुढे म्हणतात परंतु सत्वगुणाला अशी शक्ती लाभली असली तरीही जीवाला ज्या कशाने मुक्ती लाभते ते वर्म मात्र सर्वार्थाने वेगळेच असते परंतु ह्याच वर्माचे जेव्हा सहाय्य लाभते तेव्हाच हे पांडवा येथील जीवाला सात्विक शक्ती मोक्षाच्या गावाला पोहोचवते अन्यथा नाही.
ते म्हणतात ज्याप्रमाणे राजमुद्रांकित असलेल्या शुद्धसुवर्णाला जसे आगळेच मोल येते किंवा जळ कितीही सुगंधित, निर्मळ, शीतळ, आणि सौख्यदायी असले तरीही त्यास तेव्हाच पावन म्हणावे जेव्हा त्यास तीर्थपण येते किंवा नदी कितीही थोर असली तरी जेव्हा गंगा तिचा संपूर्णपणे अंगिकार करते तेव्हाच मग ती येथील जीवांना उद्धरते किंवा उध्दरू शकते, त्याप्रमाणे मनुष्य करत असलेली सर्व सात्विक कर्मे जेव्हा मोक्षाच्या गावी धाव घेतात तेव्हाच त्या कर्मामध्ये किंवा ते आचरताना मग मध्ये कोणतेही विघ्न येत नाही हे लक्षात घे आणि हे समजण्याचा प्रयत्न कर कारण याचे वर्म अतिशय गहन आणि वेगळेच आहे.
(म्हणजेच करत असलेली सर्व कर्मे जेव्हा निष्काम असतात, सकामत्वचा त्यास किंचितदेखील लेश नसतो तेव्हाच ते कर्म नुसत्या सात्विक गुणांनी नाही तर शुद्धसत्त्वाने आचरली गेली आहेत हे समजावे आणि तेव्हाच ते मग आचरणकर्त्याला कर्मबंधातून सोडवून मोक्षाच्या गावी नेते. आणि सत्वगुण शुद्धसत्वात तेव्हाच परिवर्तित होते जेव्हा मनुष्याच्याठायी रज-तम औषधालाही मागे राहत नाहीत. )


(2)देवाचे हे बोल ऐकून आणि मनात अतिशय उत्कंठित होऊन पार्थ देवास म्हणतो की हे देवा मायबापा, आता कृपा करून मला तुम्ही आधी हा सर्व अभिप्राय सांगावा, म्हणजेच कर्मामागे जे गहन असे वर्म आहे ते कृपावंता आधी तुम्ही मला संपूर्ण कथन करावे आणि पार्थाची अशी झालेली विनंती ऐकून सर्व कृपावंतांचा जो चक्रवती राजा आहे तो मग पार्थाला म्हणतो की येथे आचरलेली सात्विक कर्मे कशी मुक्तीप्रद होतात किंवा कशी मोक्षाला घेऊन जातात ते तुला मी आता येथे विशद करून सांगतो ते लक्ष देऊन ऐक.
भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की ह्या संपूर्ण जगाचे उत्पत्तीचे जे कारण आहे, जे सर्वांना येथे अनादि असे विश्रांतीची स्थानदेखील आहे, त्या स्थानाचे, त्या कारणाचे पाहू गेल्यास नाव एकच आहे परंतु त्याचे प्रकार मात्र तीन आहेत. ते म्हणतात असे ते 'ब्रम्ह' हे स्वाभाविकरित्या अनाम, अजाती आहे किंवा असते आणि हे वेदश्रुतीदेखील जाणतात परंतु येथे या संसारात अविद्येच्या रात्रीमध्ये जे जीव भांबावून गेले आहेत त्यांना पाहून आणि त्यांच्यावर दया येऊन त्यांची आणि ब्रह्माची एकदाची ओळख व्हावी म्हणून आज मी तुला त्या गहन अशा वर्माची खूण दाखवत आहे किंवा दाखवून देणार आहे.
त्या स्थानाचे, त्या कारणाचे नाव - ब्रह्म/परब्रह्म/देव/आत्मा


(3)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की या संसाराच्या दुःखाने सर्वर्था शिणून जाऊन त्यामुळे माझ्याकडे जे गाऱ्हाणे घेऊन येतात त्या जीवांना प्रत्युतार्थ मग मी/'परब्रह्म' ज्या नावाने 'ओ' देतो तोच हा संकेत आहे जाण पार्थ.
ते म्हणतात येथील जीवांचा आणि ब्रह्माचा अबोला फिटून जीव एकदाचा परब्रह्मपदी लीन व्हावा यासाठी वेदांनीच कृपाळू होऊन हा मंत्र शोधून काढला ज्या मंत्राने मग ब्रह्मास/परब्रह्मास हाक मारली असता त्या जीवांना मग सर्वत्र ब्रह्मच दिसावयास लागते(म्हणजे मी दिसावयास लागतो). परंतु ते म्हणतात येथे वेदांच्या पर्वतशिखरावर उपनिषदार्थरुपी जी सुमंगल आणि भव्यदिव्य नगरी आहे त्या नगरात जे कोणी रममाण होतात म्हणजेच वेदांचे सार असलेल्या उपनिषदात जे जीव सर्वथा रमून गेलेले असतात, ब्रह्मदेवासमवेत अशांनाच मग हा यथार्थ नाममंत्र प्राप्त होतो. ते म्हणतात हे पार्था आता अधिक काय सांगणार, वारंवार या नावाचा उच्चार करून मग प्रजापतीठायी(ब्रह्मदेवाला) देखील या सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी चांगली शक्ती आली.


(4)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की असा हा प्रजापती/ब्रह्मदेव म्हणजे या जगाचा विधाता ह्या सृष्टीपूर्वी एकटा आणि वेडापिसा होता, मी जो एक ईश्वर आहे त्याला संपूर्णपणे न ओळखल्याने चराचरदेखील कसे असते त्यास ठाऊक नव्हते. परंतु त्याच्याकडून जेव्हा माझे अर्थयुक्त चिंतन घडले तेव्हा मग या नामाला(मंत्राला) थोरपण प्राप्त झाले आणि अशी ही तीन अक्षरे त्याच्या ओठी येताच तो मग ही सृष्टी रचावयास संपूर्णपणे समर्थदेखील झाला आणि पुढे त्या ब्रम्हाने ब्राह्मण निर्मून किंवा ब्राह्मणांची निर्मिती करून त्यांचे हाती मग वेद सुपूर्त/स्वाधीन केले.
ते म्हणतात अशा या भूतलावर लोकांना आचाराची रीत व्यवस्थितरित्या कळावी म्हणून हे वेदरुपी साधन त्यांनी त्या ब्राह्मणांच्या हाती दिले आणि जीवनार्थ (जीवन निर्वाहासाठी) यज्ञव्यवसाय हा एक उपाय सांगितला आणि पुढे न जाणो त्या ब्रह्माने मग किती प्रजेची निर्मिती केली आणि त्यांना जीवन-साधन म्हणून हे त्रिभुवन अग्रहार म्हणून देऊ केले.
ते म्हणतात अशारीतीने मग या नामानेच/मंत्रानेच ब्रह्मदेवाला/विधात्यालादेखील चांगलेच थोरपण प्राप्त झाले, अशा त्या मंत्राचे स्वरूप मी तुला येथे हे पार्था आता सांगणार आहे ते ऐक.
*********************************************
अग्रहार = निर्वाहासाठी दिलेली इनाम जमीन

(5)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की येथे सर्व मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ असलेला ॐकार ह्या मंत्राचे आद्याक्षर आहे आणि त्या मंत्राचा दुसरा वर्ण 'तत्कार' हा शब्द असून तिसरा वर्ण 'सत्कार' हा आहे. म्हणजेच 'ॐ तत् सत्' असे हे पार्था तिहेरी ब्रह्मनाम आहे आणि उपनिषदात सर्व मंत्रांचे जे काही सार म्हणून सांगतात तो नाममंत्र हाच आहे.
ते पुढे म्हणतात अशा या ब्रह्मनामाशी म्हणजेच 'ॐ तत् सत्' या नावाशी एक होऊन म्हणजेच एकरूप होऊन जेव्हा सात्विक कर्म चालते तेव्हा मग त्याच्यापुढे (कर्मापुढे) हात जोडून मूर्तिमंत मोक्ष उभा राहतो. परंतु ते म्हणतात ज्याप्रमाणे दैवयोगाने कापुराचा रम्य-अलंकार जरी लाभला तरी तो नेमका कसा धारण करावा हे जसे जाणून घ्यावे लागते त्याप्रमाणेच मुखाने ब्रह्मनाम उच्चारून जरी सत्कर्म आरंभले गेले तरीदेखील त्याचा विनियोग जर का ठाऊक नसेल तर मग ते शेवटी सर्वथा वृथा होते किंवा व्यर्थ जाते.


(6)ते म्हणतात नशिबाने किंवा दैवयोगाने संत महंतांचा मेळा जरी घरी चालून आला तरीदेखील जर का मूर्खपणे त्यांचा अनादर झाला तर मग पदरीचे संपूर्ण पुण्य जसे लोप पावते किंवा सोन्याचे निर्मळ आणि सुंदर असे नाना अलंकार जरी लाभले तरीदेखील त्यांची एकत्र मोट बांधून आपला गळा जसा शोभवावा त्याप्रमाणेच जरी मुखी ब्रह्म नाम जडले आणि हातून सात्विक कर्मे घडली तरीदेखील हे धनंजया विनियोगाशिवाय ती सर्व वाया जातील हे लक्षात घे.
ते म्हणतात जर एखाद्या बाळाला भूक लागली आणि बाजूला जरी अन्नाचा ढीग पडला असला तरीही नेमके कसे खावे हे जर त्यास कळत नसेल तर मग जसा त्याला उपवास घडतो किंवा तेल, वात आणि अग्नी या तिन्ही गोष्टी जरी समीप असल्या तरीही दिवा लावण्याची युक्तीच जर ठाऊक नसेल तर मग जशी प्रकाशाची प्राप्ती होत नाही त्याप्रमाणे कर्म करण्यासाठी जरी यथोचित असा प्रसंग लाभला आणि त्याउपर हा मंत्रदेखील आठवला तरीदेखील विनियोगाशिवाय ते सर्व वृथा होय हे जाण आणि म्हणूनच परब्रह्माचे जे एक वर्णत्रयात्मक नाव आहे त्या नामाचा नेमका कर्म करताना कसा विनियोग करावा मी तुला आता यापुढे सांगेन ते धनंजया सावधान होऊन ऐक.


(7)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की 'ॐ तत् सत्' ही तीन अक्षरे हे किरीटी सात्विक कर्माच्या आधी-मध्ये आणि अंती योजावीत. ते म्हणतात ब्रह्मवेत्त्यालादेखील (ब्रह्मदेवाला) ब्रह्मसाक्षात्कार याच मंत्राने झाला आणि परब्रह्मपदी लीन होता यावे किंवा परब्रह्माशी एकरूप व्हावे म्हणून ज्ञानीलोकदेखील याच मार्गाने जातात आणि पुढे वेदशास्त्रविधी हे सर्व जाणून घेऊन यज्ञतपदान ह्या सर्व क्रिया याच मार्गाने आचरतात. तसेच ध्यान करताना हाच ॐकार मग ते मनचक्षूपुढे आणतात आणि मुखाने त्याचा नामोच्चार करतात. अशाप्रकारे ॐकार ध्यानात प्रकट करून आणि नंतर त्याचा स्पष्ट उच्चार करून आणि प्रणवाचे हेच वर्म आहे हे जाणून किंवा लक्षात घेऊन मग ते कर्म करावयास प्रवृत्त होतात.
ते पुढे म्हणतात अंधारात अभंग दिव्याचे(कधीही न विजणाऱ्या दिव्याचे) जे महत्व असते किंवा दाट रानात समर्थपणे वाट तुडवणाऱ्या मित्राचे जे महत्त्व असते तेच महत्व किंवा तेच वर्म कर्म आरंभ करताना ॐकाराचे असून तोच समर्थ मुक्तिदाता आहे हे जाण पार्था.


(8)भगवान श्रीकृष्ण मग पुढे म्हणतात की असे हे ज्ञातेजन मग स्वधर्माचे पालन करून त्याद्वारे जे धन मिळवितात ते देवाला अर्पण व्हावे यासाठी अग्नि-ब्राह्मणांच्याद्वारा मग यज्ञव्यवहार आरंभतात आणि मग आहवनीयादि अग्नीमध्ये यथाविधी यजन करतात आणि अशारितीने अशा ह्या नाना यज्ञात निष्कामत्वे ज्या ज्या उपाध्या त्यांना उपसर्ग/त्रास/पीडा देतात किंवा त्यांच्या कार्यात विघ्न आणतात त्यांचा त्याग करतात. तसेच स्वधर्म करून किंवा आचरून आणि शुद्धनीती न्यायाने विचार करून जे द्रव्य मिळवतात ते द्रव्य मग ते देश, काळ आणि सत्पात्र पाहून भूम्यादीक दान करतात. तसेच कृच्छ, एकांतर आणि चांद्रायणादिक अशी नाना व्रते आचरून आणि शरीरातील सप्तधातु शोषून घेऊन मग ते उग्र अशी तपश्चर्या करतात. आणि अशारीतीने हे पार्था हे ज्ञातेजन यज्ञतपोदान कर्मे करतात जी कर्मे या संसारात बंधक म्हणून गाजलेली आहेत परंतु तीच कर्मे हे पावन नाव उच्चारताच मग त्यांच्यासाठी मोक्षाचे साधन होतात.


(9)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की जी नाव भूमीला भार असते परंतु तीच मग जशी पाण्यामध्ये सर्वथा तारून नेते त्याप्रमाणेच जी कर्मे या संसारात बंधक म्हणून ओळखली जातात तीच कर्मे मग या नामाच्या उच्चाराने कैवल्यदायक होतात.
ते म्हणतात अशारीतीने ॐकाराचे सहाय्य घेऊन जी जी यज्ञादिक कर्मे येथे आचरली जातात ती ती सर्व कर्मे जेव्हा फलद्रूप होऊ लागतात किंवा फलद्रूप होऊ पाहतात तेव्हा मग हे ज्ञातेजन तत्कार शब्दाचे प्रयोजन करतात. ते म्हणतात ह्या सर्व जगाच्या पलीकडे जो आहे, जो तेथून सर्वांनाच पाहत असतो अशा त्या ब्रह्माची खूण दाखवण्यासाठी 'तत्' या शब्दाचे प्रयोजन केले जाते. ते म्हणतात अशा तत्-ब्रह्माचे सर्वादी म्हणून (म्हणजेच सर्व प्राणिमात्रांत जो वास करतो त्याचे) स्वतःच्या अंतरी चिंतन करतात आणि मग तत् हा शब्द उच्चारून हे ज्ञातेजन मग 'कर्मफळत्याग' करतात. म्हणजेच त्या एका परब्रह्माला आपण करत असलेली कर्मे त्यांच्या संपूर्ण फलासकट अर्पण होऊन आम्हास मात्र येथे भोगण्यासाठी मागे काहीच उरू नये असे मग ते वाचेने उच्चारतात. अशारीतीने सर्व यज्ञयागादीक कर्मे तदात्मक ब्रह्माला समर्पण करून आणि 'न मम' म्हणून हे धनंजया हे ज्ञातेजन संपूर्ण कर्मबंधनातून मुक्त होतात. ते म्हणतात अशारीतीने ॐकार हा शब्द उच्चारून जे कर्म आरंभले गेले ते मग तत्कार ह्या शब्दामुळे ब्रह्मरूप होते परंतु जोपर्यंत कर्ता वेगळा आहे तोपर्यंत कार्यभाग अजून अपुराच आहे असे जाणावे.


(10)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की पाण्यामध्ये लवण/मीठ जरी संपूर्णपणे वीराले किंवा विरघळले तरीही त्या पाण्यात मग जसे क्षारपण मागे उरते त्याप्रमाणे सर्व कर्मे जरी ब्रह्मरूप झाली तरीही कर्तेपण मागे राहिल्यामुळे मग तेथे द्वैत उरते आणि जेथे जो जो दुजेपण/द्वैतपण निपजले जाते किंवा बाकी राहते तो तो तेथे संसाराचे भय पुन्हा जोडले जाते, म्हणजेच कर्म करणाऱ्याला कर्तेपण स्वतःकडे घेतल्याने केलेल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी पुन्हा संसारात यावेच लागते.
माउली म्हणतात की जे येथे श्रीकृष्ण देव स्वतः सांगत आहेत तीच वचने वेदांचीदेखील आहेत, म्हणजेच वेददेखील तीच शिकवण देतात आणि म्हणून हें न्यून भरून काढून परब्रम्हपदी लीन होण्यासाठी परब्रह्माहून किंवा परब्रह्मापेक्षा कर्ता भिन्न नाही असे एकपण किंवा ऐक्य जातीने अनुभणे गरजेचे आहे आणि तसे ते अनुभवण्यासाठी देवानेच मग सत् हा शब्द योजिला आहे जेणेयोगे साधकाला कर्माच्या अंती अभेद असा आनंद लाभतो.
श्री हरी मग पुढे म्हणतात की अशी यज्ञादिक सर्व कर्मे जी ॐकार आणि तत्कार या शब्दांचा प्रयोग करून 'ब्रह्मरूप' केली किंवा झाली आणि मुख्य म्हणजे ज्या कर्मांना हे धनंजया येथे प्रशस्त किंवा स्तुत्य म्हणून वाखाणतात तेथे मग सत् शब्दाचा कसा विनियोग करतात हे तुला पार्था आता पुढे सांगू ते ऐक.
(यज्ञ-तप -दान ही कर्मे ह्या भूतलावर प्रशस्त/थोर/मोठी आणि स्तुत्य म्हणून वाखणतात आणि ही कर्मे केल्यानंतर सर्वसाधारण मनुष्य तर गर्वाने फुलूनच जातो. )


(11)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की असत् पदार्थाचा संपूर्ण निरास करून ब्रह्माला सत् शब्द दाखवतो म्हणजेच सत् शब्दाचा प्रयोग कर्त्याला ब्रम्हाचे दर्शन घडवितो. ते म्हणतात जे देशकालपरत्वे कधीही पालटत नाही असे जे येथे सहज आणि अव्यंग असून(म्हणजेच ज्यात काहीही विकार किंवा उणीव नसून) जे नित्य आहे किंबहुना जे अखंडितपणे आपल्यातच किंवा आपल्याचठायी वास करते, जे आत्मानुभूती आल्यानंतर मग आपण आपल्याचठायी पाहू शकतो किंवा आपण स्वतःलाच पाहत आहोत असा अनुभव येतो, असे ते 'आत्मरूप' लाभताच आणि वर संपूर्णपणे त्याच्या आश्रयाला जाताच जेथे सर्व विश्वच मग मिथ्या होऊन जाते अशा त्या परब्रम्हात सत् या शब्दाने तल्लीन होऊन कर्त्याने स्वतःचे कर्तेपण संपूर्णपणे विसरून जावे जेणेकरून मग ते प्रशस्त-कर्म ब्रह्मरूप होऊन वर कर्तादेखील ब्रह्मरूप होऊन जातो.
ते म्हणतात 'ॐकार आणि तत्कार या शब्दांनी कर्म ब्रह्माकार होते' हादेखील संस्कार जेथे उरत नाही तेथे किंवा त्यासाठीच सत् शब्दाचे प्रयोजन असते आणि ह्या निमित्ताने देवाने स्वतःच्या मनीची किंवा अंतरंगाची खूणच येथे सांगितली आहे हे जाणावे.
माऊली मग पुढे म्हणतात की अशारीतीने सत् शब्दाचा विनियोग मी नव्हे तर देवानेच येथे सांगितला. ते म्हणतात हा विनियोग मी सांगितला असे जर का मी म्हणू गेलो तरीदेखील मग मी द्वैत-दोषाला पात्र ठरीन आणि म्हणूनच हे बोल माझे नसून हे सर्व बोल देवाचेच आहेत. ते पुढे म्हणतात अजुनीही एकापरीने सत् शब्द सात्विक कर्मांना कसा सहाय्यक ठरतो तेदेखील देव पुढे सांगतील ते सर्वांनी लक्ष देऊन ऐकावे.


(12)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की यज्ञदानादिक सत्कर्माचे यथाशास्त्र(शास्त्रानुसार) जेव्हा आचरण चालते किंवा होते तरीदेखील प्रसंगी त्यात काहींनाकाही न्यून राहते किंवा राहू शकते, म्हणजेच एखादे गात्र ढिले पडताच शरीराचे यंत्र जसे थांबते आणि त्याचे सर्व व्यापार बंद पडतात किंवा चाकांमध्ये बिघाड येताच रथ जसा बंद पडतो त्याप्रमाणेच सत्कर्मालादेखील एखाद्या गुणाशिवाय जेव्हा असत्कर्मपण येते किंवा प्राप्त होते त्यावेळी ॐकार आणि तत्कार या दोन शब्दांचे साहित्य घेऊन आणि सत् शब्द उच्चारून त्या सत्कर्मांचा मग स्वाभाविकपणेच जीर्णोद्धार करावा. अशारीतीने मग सत् शब्द आपल्या सामर्थ्याने केलेल्या कर्मांना त्याचे असत्पण फेडून सत्पण आणतो. ते म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या व्याधीग्रस्ताला दिव्य औषधी द्यावी किंवा भयभीत झालेल्या माणसाला धीर द्यावा त्याप्रमाणेच सात्विक कर्मांमध्ये जे जे न्यून राहून गेले आहे ते मग हा सत् शब्द भरून काढतो.


(13)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की मार्गाने जात असता भूल पडून वाटसरूला जशी मग पुढील वाढ दिसेनाशी होते किंवा एखादा अमूल्य रत्न पारखताना एखाद्या पारख्या हातूनदेखील चूक घडू शकते, ते म्हणतात हे पार्था ज्याप्रमाणे व्यवहारात असे घडून येऊ शकते येथेदेखील सर्वथा तसेच आहे हे जाण.
ते म्हणतात एखादी घोडचूक होऊन किंवा प्रमाद घडून ते कर्म जेव्हा निषिद्ध वाटेने चालू लागते तेव्हा त्या कर्माला शुद्ध करण्यासाठी सर्वार्थाने सत् शब्दाचे प्रयोजन करावे आणि म्हणून हे अर्जुना ॐकार आणि तत्कार या दोनही शब्दांपेक्षा सत् शब्द हा थोर आहे हे जाण. ते म्हणतात ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा किंवा ओढ्याला जशी गंगा येऊन भेटावी किंवा एखाद्या मृत माणसाला सजीव करण्यासाठी अमृताचाच वर्षाव व्हावा त्याप्रमाणे एखाद्या दुष्कर्माला पावन करण्यासाठी सत् शब्दाचे प्रयोजन असते हे लक्षात घे. ते म्हणतात अशारीतीने सत् शब्दाचे थोरपण असे असामान्य असते हे जाण पार्था.
ते पुढे म्हणतात अशा या नामाचे वर्म आहे किंबहुना हे नाम म्हणजेच तत्वता परब्रह्म आहे हे लक्षात घे. ते म्हणतात 'ॐ तत् सत्' हे नाम मनुष्याला ते स्थान दाखवते जिथून हे सर्व चराचर किंवा ही सर्व दृश्यजात प्रकाशते किंवा जन्माला येते. ते म्हणतात असे जे स्थान मी तुला आता सांगितले ज्याला 'ब्रह्म' असे नाव आहे जे स्वभावताच शुद्ध आणि निर्विशेष आहे त्या ब्रह्माची अंतरंग खूण या तीन अक्षरांनी मी तुला आज येथे दाखवून दिली आणि जरी 'नाम' आणि 'ब्रह्म' या दोन गोष्टी वेगवेगळ्या वाटत असल्या तरीही ते एकच असून अभेद आहे. ते म्हणतात ज्याप्रमाणे नभाला नभाठायी आश्रय लाभतो त्याप्रमाणेच ह्या दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत. ते म्हणतात सूर्य जसा उगवून स्वतःच स्वतःचे सूर्यपण प्रकटतो म्हणेजच स्वतःचे अस्तित्व दाखवून देतो त्याप्रमाणेच 'ॐ तत् सत्' हे नामच खऱ्या अर्थाने ब्रह्मसाक्षात्कार घडविते आणि म्हणूनच हे पार्था ही तीन अक्षरे म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मच आहे तू जाण.


(14)भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की मग हातून घडलेले यज्ञतपदान ही कर्मे पूर्ण-अपूर्ण मग कसेही असो परंतु लोखंडाला परीसाचा स्पर्श होताच मग त्या सोन्यात जसे चोख-हीन असे काहीही उरत नाही त्याप्रमाणे सर्व कर्मे ब्रह्मार्पण केली असता ती मग पूर्णपणे 'ब्रह्मरूप' होतात. ते म्हणतात नद-नदी जसे सागराला मिळताचक्षणी मग सागरच होऊन राहतात त्याप्रमाणेच सर्व कर्मे ब्रह्माला अर्पण केली असता त्यामध्ये मग पूर्ण-अपूर्ण असे काहीही उरत नाही.
श्रीहरी पुढे म्हणतात की हे प्रज्ञावंता, हे अर्जुना अशारितीने ब्रह्मनामाचे अपार सामर्थ्य मी तुला वर्णन करून सांगितले, तसेच त्यातील एकेक अक्षरांचा तुला विनियोगदेखील सांगितला परंतु अशा या ब्रह्मनामाचे रहस्य तुला व्यवस्थित आकळले ना? तेव्हा तुझा आता एकनिष्ठ भाव संपूर्णपणे आणि सदैव या नामातच असू दे त्यायोगे मग तुझ्या जीवाला जीवनमुक्तपण येऊन प्रपंचाचे बंधन उरणार नाही.
ते शेवटी म्हणतात तेव्हा ज्या कोणाकडून येथे सत् शब्दाच्या विनियोगाने कर्मांचे आचरण घडेल त्यांच्याकडून मग त्या योगाने किंवा त्या निमित्ताने वेदांचेही सांगोपांग/साद्यन्त अनुष्ठान घडेल हे जाण पार्था.


(15)भगवान श्रीकृष्ण मग पुढे म्हणतात की परंतु असे असूनही येथील जीव सर्वथा श्रद्धाहीन होऊन दूराग्रहाने मग हा पंथ सोडून देतात आणि मग अशांनी कितीही अश्वमेध आचरले किंवा दीर्घकाळ उभे राहून एकांगुष्ठी तपश्चर्या केली किंवा पृथ्वीभरून जरी रत्ने दिली किंवा समुद्राएवढे तलाव बांधले तरीही ते सर्व अंती वृथाच होतात हे जाण पार्था.
ते म्हणतात ज्याप्रमाणे खडकी प्रदेशात झालेली मेघवृष्टी किंवा राखेत दिलेली आहुती किंवा सावलीला दिलेले आलिंगन जसे व्यर्थ असते किंवा गगनाला(म्हणजेच आपल्या समोरील मोकळ्या जागेला) हाताने हाणले असता तो सर्व खटाटोप जसा व्यर्थ जातो त्याप्रमाणेच यज्ञदानतप इत्यादींचा खटाटोपदेखील अंती व्यर्थच जातो. ते पुढे म्हणतात ज्याप्रमाणे नुसत्या दगडाला घाण्यात गाळले असता तेल किंवा पेंड काहीच हाती लागत नाही किंवा कितीही श्रमले असता गाठीशी जर दारिद्र्य तसेच राहणार असेल तर काय फायदा किंवा शिदोरी म्हणून खापर पदरी बांधला असता जशी ती शिदोरी मग भुकेला निवारत नाही आणि मग उपवास घडतच जातो त्याप्रमाणेच यज्ञतपदानादिक ही सर्व कर्मे हे पार्था विनियोगाशिवाय व्यर्थ जातात जेणेकरून या इहलोकात तर सुख उपभोगता येतच नाही तर परलोकी ते कोठून मिळणार?
म्हणूनच हे कौंतेया, हे पांडवा येथे या संसारात ब्रम्हनामसोडून किंवा त्यावरची श्रद्धा सांडून येथे जो जो धंदा करावा तो तो इह-पर-लोकी वृथा घेतलेला शिणच आहे किंवा असतो हे जाण असे देव नारायण पार्थाला सांगतात.


(16)माउली शेवटी म्हणतात की ज्याप्रमाणे पातककुंजराला पंचानन असलेला आणि त्रितापरुपी तमाला भास्कर असलेला जो वीर नरहरी, श्रीधर मुरारी, देव श्रीहरी जेव्हा असे म्हणतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र चांदण्यामध्ये जसा लीन व्हावा त्याप्रमाणेच भक्त अर्जुन मग एकाएकी निजानंदी तल्लीन झाला. माऊली पुढे म्हणतात की ज्याठिकाणी बाणाग्रांच्या वाणीनेच म्हणजेच आवाजानेच हा संग्राम जीवाला मापून घेतो किंवा व्यापून टाकतो त्याठिकाणी म्हणेजच अशा त्या कर्कश्य प्रसंगी पार्थ पहा कसे स्वानंदाचे राज्यच उपभोगत आहे. ते म्हणतात अर्जुनाशिवाय कोणाच्याहीठायी आज हा भाग्योदय नाही.
तिथे दुसरीकडे संजय म्हणतो की हे कौरवांच्या राजा, हे धृतराष्ट्रा शत्रूचे हे गुण पाहून आम्हालादेखील असे वाटत आहे की आम्हालादेखील आज सर्वार्थाने आत्मसुखदाता देणारा गुरूच लाभला. तो म्हणतो जर अर्जुनाने देवाला हे सर्वकाही विचारले नसते तर देवानेदेखील हे ज्ञान आपल्याला सांगितले असते का? आणि मग आम्हाला कसा परमार्थ जोडता आला असता किंवा कसा घडला असता? तो म्हणतो मीदेखील आजतागायत ह्या जन्म-मरणाच्या चक्रात गोते खात होतो आणि अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होतो परंतु हे राजा आज मी येथे आत्मप्रभेच्याच मंदिरात प्रवेश केला आहे आणि अशारीतीने हे राजा तुम्हा-आम्हांवर पंडुसुताने आज थोर उपकार केला आहे आणि म्हणूनच अर्जुन म्हणजे आम्हाला व्यासांचा बंधूच वाटून आज आमच्यासाठी खऱ्या अर्थाने तो गुरुदेवदेखील झाला आहे. परंतु एवढे बोलून संजय स्वतःच्या मनी म्हणतो की आता हे आपले बोलणे आवरते घेऊयात नाहीतर ते राजाला खुपेल आणि ते नाराज होतील.
माऊली मग पुढे म्हणतात की अहो श्रोतेजन पार्थाचे गुणगान गात असलेल्या संजयला आता एकीकडे ठेवून पार्थ मग पुन्हा देवाला काय विचारेल तेच मी तुम्हाला पुढच्या अध्यायात सांगेन ते तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकावे असा मी निवृत्तीचा दास ज्ञानेश्वर तुम्हाला विनंती करत आहे.