ध्यान धारणा कशी करावी हे भगवान श्री कृष्णाने ज्ञानेश्वरीत म्हणजेच भगवद-गीतेत सहाव्या अध्यायात विस्ताराने सांगितले आहे, ते पुढील प्रमाणे.
अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६......ध्यान योग
https://www.canva.com/ |
तरी पार्था आतां । ऐक सविस्तर । सांगतों साचार ।
योगमार्ग ॥३२७॥
परी अभ्यासोनि । घ्यावा अनुभव । तरी च तें सर्व ।
सार्थ होय ॥३२८॥
भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्था मी जो तुला आता सविस्तररित्या योगमार्ग सांगणार आहे तो नीट लक्ष देऊन ऐक. त्याकडे नीट लक्ष दे आणि आणि व्यवस्थित याचा अभ्यास करून किंवा सराव करून करूनच त्याचा अनुभव पदरी पाडून घे तरच मी काही सांगतो आहे ते सर्वकाही सार्थकी लागेल. म्हणजेच जेव्हा ते तू व्यवस्थितपणे अभ्यासशील आणि त्याचा नीट सराव करून अनुभव घेशील तेव्हाच हे सर्व सार्थ झाले असे मी म्हणेन.
ह्या चि लागीं तैसें । सुयोग्य बरवें । लागेल पहावें ।
स्थान एक ॥३२९॥
मनःशांतीसाठीं । घालितां आसन । नुठावें जेथून ।
ऐसें वाटे ॥३३०॥
देखोनि जें वाढे । वैराग्य द्विगुणें । जें कां संतजनें ।
वसविलें ॥३३१॥
जेथें संतोषासी । लाभतें सहाय्य । जेथें मनोधैर्य ।
उल्हासतें ॥३३२॥
जेथें अनायासें । घडे योगाभ्यास । लाधे साधकास ।
स्वानुभूति ॥३३३॥
ऐसी रम्यतेची । थोरवी साचार । असे निरंतर ।
जया स्थानीं ॥३३४॥
ते म्हणतात की ह्यासाठी म्हणजेच ध्यानाला बसण्यासाठी पहिले काम म्हणजे एक चांगले सुयोग्य असे स्थान पाहावे, जेथे मनःशांतीसाठी जो कोणी बसेल मग त्याला तेथून उठू नये असे वाटावे.
तसेच जे स्थान पाहून साधकाच्याठायी असलेले वैराग्य द्विगुणित होईल असे ते असावे आणि मुख्य म्हणजे ते संतजनांनी वसविलेले असावे. (म्हणजेच संतांनी तेथे ध्यानाचा सराव करून ते स्थान जागृत केलेले असावे.)
तसेच जेथे मनुष्याच्याठायी असलेल्या संतोषालादेखील अधिकचे साहाय्य लाभून साधकाचे मनोधैर्य उंचावेल व अधिकच उल्हसित होईल असे असावे. जेथे अनायासेच म्हणजेच अधिक कष्ट न पडता योगाचा अभ्यास होऊ शकेल आणि साधकाला स्वानुभूती लाभावयास देखील कठीण जाणार नाही.
पाहें पाखांडी जो । तयाचें हि मन । पाहोनि तें स्थान ।
वेध घेई ॥३३५॥
तया हि तेथें चि । आचरावें तप । ऐसी आपोआप ।
इच्छा होय ॥३३६॥
हिंडतां सहज । कोणी अकस्मात् । जरी झाला प्राप्त ।
तया स्थानीं ॥३३७॥
असो कामुक हि । तरी तेथोनियां । मागें परताया ।
विसरे तो ॥३३८॥
न राहता तरी । तया हि राहवी । तेंवी चि बैसवी ।
हिंडत्यातें ॥३३९॥
ते पुढे म्हणतात ज्याठिकाणी रम्यतेची थोरवी एवढी निरंतर असावी की तेथे मग एखादा पाखंडी जरी आला तरी ते स्थान त्याच्या मनाचा वेध घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला देखील मग तेथे तप आचरावे असे स्वतःहून आणि आपोआपच वाटेल.
तसेच अशा ठिकाणी सहज हिंडताना जर कोणी अकस्मात येऊन ठेपला आणि वर तो कामुक जरी असला तरी ते स्थान पाहून तेथून मागे फिरणे किंवा माघारी परतणे ह्याचा त्यास सर्वाथाने विसर पडला पाहिजे.
तसेच सतत हिंडणाऱ्या व्यक्तीला आणि कधीही एका जागी न थांबणाऱ्या मनुष्याला देखील ते स्थान पाहून आता येथेच राहूयात किंवा येथेच बसुयात असे वाटावयास हवे.
झोंपलें वैराग्य । तरी थापटोनि । जागृतीसी आणी ।
तयासी जें ॥३४०॥
विलासी जे होती । तयांतें हि साच । पाहतांक्षणींच ।
ऐसें वाटे ॥३४१॥
राज्य तरी तें हि । सोडोनियां द्यावें । येथें चि रहावें ।
स्वस्थपणें ॥३४२॥
ते पुढे म्हणतात की ज्यांचे वैराग्य अजूनही झोपलेलेच आहे म्हणजेच आजतागायत कधीच जागे झालेले नाही त्याला देखील(म्हणजेच त्याच्याठायी असलेल्या वैराग्याला देखील) ते स्थान थापटून जागे करणारे असावयास हवे.
तसेच जे विलासी आहेत, ऐश्वर्यात जगणारे आहेत त्यांना देखील ते स्थान पाहताचक्षणी असे वाटावयास हवे की आपले राज्य सोडून देऊन आता यापुढे येथेच स्वस्थपणे आपला मुक्काम ठोकावा.
ऐसें जें सुंदर । पावन उत्तम । जेथें भेटे ब्रम्ह ।
मूर्तिमंत ॥३४३॥
असेच सुंदर, उत्तम आणि पावन ते ठिकाण असून आपल्याला तेथे मूर्तिमंत ब्रह्म भेटेल ह्याची शाश्वती ते स्थान पाहून व्हावयास हवी किंबहुना असेच स्थान निवडावे.
पहावें तैसें च । आणिक हि एक । राहती साधक ।
जया स्थानीं ॥३४४॥
आणि जे का होती । सामान्य सकळ । तयांची वर्दळ ।
नसे जेथें ॥३४५॥
अमृतासमान । गोड जीं समूळ । दाट झाडें फळ-।
युक्त जेथें ॥३४६॥
वर्षाकाळ तरी । अत्यंत निर्मळ । विशेष जें जळ ।
निर्झरांचें ॥३४७॥
तें चि जया स्थानीं । पाउलागणिक । आढळे गा देख ।
अनायासे ॥३४८॥
ऊन तें हि जेथें । सौम्य भासताहे । मंद वारा वाहे ।
शांतपणें ॥३४९॥
जेथें एकाएकीं । रिघेना श्वापद । शुक वा षट्पद ।
नाढळती ॥३५०॥
आणि अजून एक पार्था, ज्या स्थानी किंवा ज्याठिकाणी जेव्हा कोणी साधक राहतील तेव्हा त्याठिकाणी मग सामान्य लोकांची वर्दळ नसावी. परंतु आजूबाजूला अमृतासमान गोड फळे देणारी दाट झाडी असावीत.
ते पुढे म्हणतात वर्षाऋतूत देखील अतिवृष्टी होणार नाही असे ते स्थान असून पाणी असल्यास ते निर्मळ असावे. विशेषकरून ते झऱ्यांचे असेल असे पाहावे आणि असे झरे साधकाला पावलोपावली अधिक सायास न घडता उपलब्ध होतील असे असावे.
आणि ऊन जरी आले तरी दाट झाडांमधून झिरपून आल्याने सौम्य वाटेल व वारा मंद आणि शांतपणे वाहत असेल असे ते ठिकाण असावे. तसेच हे स्थान असे असावे की तेथे एकाएकी श्वापदे येणार नाहीत व शुक(पोपट वगैरे) आणि षट्पद आढळणार नाहीत किंवा त्यांचा त्रास होणार नाही हे पाहावे.
बहुधा नि:शब्द । असावें तें स्थळ । बैसला कोकिळ ।
बसो तेथें ॥३५१॥
जळाश्रयें हंस । असोत त्या ठायीं । चार दोन पाहीं ।
चक्रवाक ॥३५२॥
मध्यंतरीं मोर । आले गेले कांहीं । आमुची ना नाहीं ।
तयालागीं ॥३५३॥
परी योगाभ्यासा । ऐसें चि ठिकाण । आवश्यक जाण ।
पंडुसुता ॥३५४॥
ते पुढे म्हणतात म्हणजेच ते स्थळ बहुदा शांत आणि निशब्द असणारे असावे, हा परंतु तेथे जर झाडावर कोकीळ बसला तर बसूदेत.
तसेच जळाच्या आश्रयाला हंस आले तर येऊदेत आणि दोन-चार चक्रवाक पक्षी असले तरी चालतील व अधूनमधून मोर आले-गेले तरी त्यासाठी आमची काही ना नाही.
परंतु हे पंडुसुता, हे धनंजया तुला जर योगाभ्यास करायचा असेल व तो तडीस न्यायचा असेल तर त्यासाठी अशाच स्थानाची आवश्यकता आहे किंबहुना असेच स्थान निवडावे.
मग गूढ मठ । किंवा शिवालय । मानलें जें होय ।
चित्तालागीं ॥३५५॥
दोहोंतील एक । कोणतें हि घ्यावें । तेथें चि बैसावें ।
एकांतांत ॥३५६॥
पाहोनि जें स्थान । स्थिरावेल मन । तेथें चि आसन ।
रचावें गा ॥३५७॥
वरी मृगाजिन । माजीं धूतवस्त्र । तळवटीं साग्र ।
दर्भाकुर ॥३५८॥
सारिखे सुबद्ध । असावे कोमल । कीं जे राहतील ।
एकपाडें ॥३५९॥
परी जरी होय । आसन तें उंच । तरी अंग साच ।
कलंडेल ॥३६०॥
तेविं होय जरी । सहजे सखल । तरी बाधतील ।
भूमिदोष ।॥३६१॥
म्हणोनियां तैसें । करावें ना कांहीं । धरावें तें पाहीं ।
समभाग ॥।३६२॥
आसन तें ऐसें । असावें साचार । पुरे हा विस्तार ।
येथें आतां ॥३६३॥
भगवान श्री कृष्ण पुढे म्हणतात की मग एक गूढ मठ किंवा शिवालय ह्यांपैकी कोणतेही एक ठिकाण जे तुमच्या चित्ताला मानवेल, रुचेल ते घ्यावे आणि तेथे कोठेतरी एकांत साधून बसावे.
मग त्याठिकाणी जे स्थान पाहून तुमचे मन स्थिरावेल अशाठिकाणी मग आसन रचावे किंवा अंथरावे. ते म्हणतात आसन असे असावे की ते वरच्या बाजूला मृगाजिन असून म्हणजेच हरणाचे कातडे असून मध्ये धूतवस्त्र म्हणजेच धुतलेले वस्त्र व खाली तळाला दुर्वांकुर असावेत. (असे तीन थर लावावेत.)
तसेच ते म्हणतात असे हे आसन नेहमी सर्वत्र सारखे असून, सुबद्ध आणि कोमल असुद्यावे आणि मुख्य म्हणजे ते एकाच पातळीत असावे जेणेकरून बसावयास कष्ट पडणार नाही.
म्हणजेच जर का ते उंच असेल तर अंग कलांडण्याची शक्यता निर्माण होईल आणि जर का ते सखल झाले किंवा खोल गेले तर साधकाला भुमीदोष बाधण्याची शक्यता निर्माण होईल.
म्हणून तसे काहीही न करता जेथे समभाग असेल किंवा आढळेल तेथेच आपले आसन रचावे. ते शेवटी म्हणतात आता कशाप्रकारे आसन असावे आता ह्याचा विस्तार पुरे करून किंवा आवरता घेऊन मी पुढे सांगतो.
तरी ऐसें स्थान । पाहोनियां तेथें । मग स्वस्थचित्तें ।
धनंजया ॥३६४॥
घ्यावा अनुभव । योगाचा सूंपर्ण । करोनि स्मरण ।
सद्गुरूचें ॥३६५॥
सद्गुरु सादर । आठवतां चित्तीं । भरे सत्त्ववृत्ति ।
अंतर्बाह्य ।॥३६६॥
अहं-भावनेची । विरे कठिणता । स्फुरे स्वभावतां ।
सोहंभाव ॥३६७॥
तेणें विषयांचा । पडोनि विसर । जिरे सर्व जोर ।
इंद्रियांचा ॥३६८॥
अंतरीं रिघोन । स्थिरावे तें मन । ऐसें ऐक्य पूर्ण ।
प्राप्त होय ॥३६९॥
तोंवरी तैसें चि । करावें स्मरण । तेथें चि राहोन ।
साधकाने ॥३७०॥
त्या चि ऐक्यतेच्या । बोधें मग तेणें । आसनीं बैसणें ।
स्वस्थ-चित्तें ॥३७१॥
आतां अंग चि तें । सांवरी अंगातें । धरी पवनातें ।
पवन तो ॥३७२॥
ऐसा अनुभव । पावे उत्कर्षातें । बैसतां चि तेथें ।
आसनीं त्या ॥३७३॥
प्रवृत्तीची धांव । वळोनि माघारी । येई ऐल तीरीं ।
समाधि ती ॥३७४॥
सर्व हि अभ्यास । पूर्ण होतो साच । बैसतांक्षणीं च ।
आपोआप ॥३७५॥
मुद्रेचें महत्त्व । ऐसें चि तें आतां । ऐक पंडुसुता ।
सांगेन मी ॥३७६॥
भगवान श्री कृष्ण पुढे म्हणतात की हे धनंजया मग असे ठिकाण पाहून तेथे आसन घालून स्वस्थचित्ताने बसावे आणि सद्गुरुंचे स्मरण करून योगाचा संपूर्ण अनुभव घ्यावा.
ते म्हणतात सद्गुरुंचे चित्तात स्मरण सुरु होताच साधकाच्या अंतर्बाह्य सत्त्व-वृत्ती भरावयास सुरुवात होते आणि जेव्हा सोहंभाव त्याच्याठायी स्फुरावयास लागतो किंवा त्याचे स्फुरण चढावयास लागते तेव्हा स्वाभाविकपणेच मग त्याच्या अंगी असलेली अहंभावाची कठीणता हळूहळू लोप पावू लागते.
आणि त्याद्वारे मग हळूहळू सर्व विषयांचा विसर पडून इंद्रियांचा जोर देखील कमी होण्यास सुरुवात होते आणि चारी बाजूंना धाव घेणारे मन मग अंतरात रिघून किंवा वळून तेथेच स्थिरावण्यास सुरुवात होते,
परंतु जोपर्यंत बुद्धी आणि मनाचे ऐक्य होत नाही तोपर्यंत साधकाने त्याच जागी राहून सद्गुरुंचे स्मरण असेच सुरू ठेवावे.
(सोहंभाव = ‘मी ब्रह्म आहे’ ही भावना, म्हणजेच ‘मी देह नसून आत्मा आहे’ ही भावना.)
ते पुढे म्हणतात मग अशा ऐक्यतेच्या बोधाने किंवा मन आणि बुद्धी ह्यांच्या झालेल्या ऐक्याच्या जोरावर साधकाने स्वस्थचित्त त्या आसनावरच बसून राहावे.
जेव्हाकेव्हा साधक ही अवस्था गाठेल तेव्हा मग त्याचे अंगचं मग त्याच्या अंगाला सावरून घेत राहील आणि पवन म्हणजेच प्राणवायू प्राणवायूला खेचत राहील.
आणि मग हाच अनुभव त्या आसनावर बसून तुम्हांला मग उत्कर्षाला घेऊन जाईल. मनाच्या प्रवृत्तीची धाव(इंद्रियांची धाव) माघारी वळून अंतरात स्थिरावेल आणि मन समाधीच्या अलीकडच्या तीरावर येऊन पोचेल.
(म्हणजेच हळूहळू समाधी लागावयास सुरुवात होईल.)
ते पुढे म्हणतात हे पार्था हा सर्व अभ्यास म्हणजेच समाधीपर्यंत पोचेपर्यंतचा सर्व अभ्यास आसनावर बैठक घालताच आपोआप पूर्ण होतो.
कारण सिद्ध झालेल्या स्थानाचे महत्व देखील तेवढेच थोर असून तेच त्याला समाधीपर्यंत घेऊन जाण्यास एकप्रकारे मदत करते. आता यापुढे मी तुला मुद्रेचे महत्व सांगेन ते ऐक.
यापुढे कुंडलिनी जागृती आहे त त्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करावे
कुंडलिनी शक्ती जागृत कशी करावी आणि त्यासाठी उत्तम मार्ग कोणता?