भक्ती का करावी?

कारण-२: हीन आयुष्य

 भक्ती का करावी?- कारण २ – हीन आयुष्य:

लाभलेल्या हीनपणाच्या आयुष्यातून सुटका होण्यासाठी आणि समाजात ताठ मानेने जगता यावे यासाठी मनुष्याने भक्ती करावी.

मनुष्याच्या वाट्याला येथे जे काही येते ते त्याच्या प्रारब्धामुळेच, त्याच्या कर्मामुळेच किंवा त्याच्या नशिबामुळेच.

म्हणजेच प्रारब्धामुळेच त्याच्या वाट्याला भोग येतात आणि प्रारब्ध जर कठीण/गाढ/बळिवंत असेल तर अधिकच भोग येतात, किंबहुना अधिकच वाईट भोग येतात, अधिकच संकटे येतात आणि अशा त्या संकटांमुळे मनुष्य मग पुढे हतबल होत जातो, पिचला जातो आणि हिनपणाचेच आयुष्य भोगणे त्याच्या पदरी येते आणि हळूहळू धैर्य खचून ठायी असलेला आत्मविश्वास देखील नाहीसा होतो आणि मग सर्वकाही अवघड होऊन बसते.

आणि म्हणूनच अशा ह्या लाभलेल्या हिनपणाच्या आणि नामुष्कीच्या आयुष्यापासून सुटका हवी असेल तर देवाला शरण जावे, त्याची भक्ती करावी, कारण असे आयुष्य हे बहुधा प्राराब्धामुळेच पदरी येते आणि प्राराब्धापासून सुटका हवी असेल तर देवाला शरण जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही.

कारण प्रारब्ध ही अशी गोष्ट आहे की तिची कितीही बोळवण केली किंवा तिच्यापासून कितीही सुटका करण्याचा प्रयत्न केला तरीही ती मनुष्याची पाठ काहीकेल्या सोडत नाही, किंबहुना जेवढे प्रयत्न करू तेवढे अधिकच हात धुऊन त्याच्या मागे लागते, कारण येथे मनुष्याच्या सोबत सतत जर कोणी असेल तर ते एक प्रारब्धच असते, त्याचे संचित/कर्मच असते आणि तेच त्याची साथ करते.

म्हणजे ज्यांना ह्या संसारात येऊन हीनपणाचे आयुष्य लाभते किंवा नामुष्कीचे जीवन पदरी येते आणि वर काहीकेल्या त्यातून मान बाहेर काढता येत नाही, उलट परिस्थितीला शरण होऊनच जगावे लागते, अशांनी देवाला शरण जावे आणि त्याची भक्ती करावी.

कारण ज्या हिम्मतीने/शौर्याने त्यातून बाहेर पडावे ती हिम्मतच त्यांच्या गाठीशी नसल्याने त्यासाठीचे आवश्यक बळच त्यांच्या अंगी नसते, कारण ज्या आत्मविश्वासातून हे बळ निपजते, मुळात तोच त्यांच्यापाशी नसल्याने किंवा परिस्थितीमुळे तो त्यांनी गमावला असल्याने तीच्याशी चार हात करून तिच्यातून बाहेर पडण्याची इच्छा असूनही त्यांना ते शक्य होत नाही.

कारण शूरत्व(हिम्मत) /आत्मविश्वास ह्या अशा गोष्टी आहेत की बहुधा मनुष्य त्या कशाच्या तरी जोरावरच खेचून आणतो आणि अंगी बाणवतो, परंतु केवळ स्वबळावर त्याला तसे करणे कधीही शक्य नसते.

उदाहरणार्थ काही लोक हा आत्मविश्वास धनाच्या, ज्ञानाच्या, कलेच्या, शारीरिक बळाच्या जोरावर कमावतात तर दुसरीकडे ज्यांना हे शक्य नाही ते मग जातीच्या, धर्माच्या, कुळाच्या मोठेपणावर आणि अगदीच नाहीतर शारीरिक सौंदर्याच्या जीवावर तरी मिळवतात आणि समाजात ताठ मानेने जगतात.

म्हणजेच ज्या कोणत्या गोष्टींना ह्या समाजात महत्व आहे, मान आहे, असे काहीतरी आपल्या पाठीशी आहे, जे आपली कठीण परिस्थितीत आणि समयी पाठराखण करू शकेल, ह्या विश्वासाच्याच बळावरच ते ह्या गोष्टींतून आत्मविश्वास कमावतात आणि तो मिरवतात, परंतु नाशिवंत गोष्टीतून कमावलेला आत्मविश्वास देखील नाशिवंतच असतो, त्यांचा देखील त्या गोष्टींच्या नाशासोबत नाश घडून येतो.

तेव्हा ज्याकोणाला केवळ असा कामापुरताच असलेला आत्मविश्वास नको असून खरेखुरे आणि अभूतपूर्व असलेले शूरत्व/शौर्य/धैर्य अंगी यावे असे वाटत असेल जे मग कोणत्याही सांसारिक गोष्टीने डगमगत नाही किंवा कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही त्याचे खच्चीकरण देखील घडून येत नाही त्यांनी श्री हरिची भक्ती करावी, त्याची चरणसेवा करावी, त्या शरण जावे.

 

तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या पुढील अभंगात म्हणतात मनुष्याने ह्या संसारात येऊन हीणपणे का बरे जगावे? नामुष्कीचे आयुष्य का बरे कंठावे आणि ते देखील कशासाठी, कोणत्या लाभासाठी? म्हणजे असे ह्या नाशिवंत संसारात नेमके काय वाढून ठेवले आहे जे पदरी पाडून घेण्यासाठी त्याने असे केविलवाणे आणि लाजिरवाणे जीवन स्वीकारावे?

म्हणजे असा कोणता अमूल्य ठेवा त्याला प्राप्त होणार आहे ज्यासाठी त्याने असे नाचक्कीचे जगणे कंठत राहावे? कारण ह्या संसारातील सर्वकाही त्या संसारासारखेच असते, नाशिवंत, क्षणभंगुर आणि फसवे. आणि अशासाठी का बरे कोणी आपला आत्मविश्वास आणि सन्मान पणाला लावावा, का बरे कोणासमोर मान तुकवावी?

म्हणजे सारासार विचार करू गेल्यास असे कळून येते की ह्या संसारातून मनुष्याला लाभदायक ठरेल असे काहीच नाही, त्यामुळे का बरे त्याला अधीन जावे आणि त्याची हाजीहाजी करावी? त्यापेक्षा हिमतीचे जिणे काय वाईट?, ताठ मानेने जगणे का बरे सोडावे?

ते पुढे म्हणतात येथे प्रत्येकाला त्याच्या प्रारब्धानुसारच जीवन मिळते आणि त्याला साजेसाच असा संसार त्याच्या पदरी येतो आणि हे प्रारब्ध जर गाढ/बळिवंत असेल तर अधिकच भोग वाट्याला येऊन मनुष्याचे त्याच्यासमोर काहीही चालत नाही, उलट तो त्याच्यापुढे मग हारच मानतो आणि मग ते माणसाला अधिकच नाडते, त्याची बुद्धी देखील भ्रष्ट करून टाकते, ज्यामुळे मग त्याला त्यातून सुटायचा मार्ग देखील सापडेनासा होतो.

आणि मुख्य म्हणजे अशावेळी मग देवाला शरण जाण्याऐवजी तो परिस्थितीलाच शरण जातो आणि त्याच्या अधीन होऊन राहतो आणि त्याची कितीही इच्छा असली तरीही त्याला त्यातून मान वर करता येत नाही आणि हवे तसे किंवा अपेक्षित जीवन व्यतीत करता येत नाही, उलट हीनपणाचे आयुष्यच भोगत राहवे लागते.

परंतु ते म्हणतात की प्रारब्ध ही अशी गोष्ट आहे की ती मनुष्यासोबत असतेच असते, म्हणजे तिची कितीही बोळवण केली तरीही ती काही आपली पाठ सोडत नाही, तिच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरीही ती आपल्या सांगाती येतेच, त्यामुळे मनुष्याने तिच्यापासून पाठ सोडवण्याऐवजी देवाची पाठ धरावी, त्याचा पिच्छा पुरवावा, त्याला वेठीस धरावे, त्याला साकडे घालावे.

कारण ते म्हणतात अशा त्या प्रारब्धाचे काय व्हायचे असेल ते होऊदेत, त्याकडे लक्ष न देता स्वतःच्या हिताकडे त्याने लक्ष द्यावे, कारण नशिबाचा फेरा काहीकेल्या मनुष्याला चुकत नाही, ते भोगणे अपरिहार्यच असते.

आणि हे जाणून घेऊन किंवा चांगलेच आणि नेहमी लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थतीत त्याने हिम्मत सोडू नये, धैर्य खचू देऊ नये, अंगी हिम्मतीची थार असू आणि हे करणे प्रसंगी कठीण असल्यानेच त्याने त्याने देवाला शरण जावे, म्हणजे हे सर्व सहज घडून यावे यासाठी त्याची देवाची भक्ती करावी.

कारण एकदा का त्याची कृपा झाली आणि त्याची मेहेरनजर तुमच्यावर पडली की त्याचे भले झालेच म्हणून समजावे, त्याच्या उद्धाराला सुरुवात झालीच म्हणून जाणावे, कारण अशा त्या मनुष्याचे कर्म मग कितीही कठीण असले तरीही एकदा का त्याने भक्तीला सुरुवात केली आणि देवाचे पाय पकडले की त्याची पुढे संसारात कधीही अवकळा होत नाही, नामुष्कीच्या आयुष्यातून त्याची सुटका होऊन त्याचे प्रारब्ध देखील हळूहळू कमी होत जाते आणि परिणामी ते संपूर्णच नासून त्याचे भवभयच दूर होते आणि अंती शूरत्वाचे जगणे त्याच्या पदरी येते.

🌻🌿🌻🌿

ज्यावें हीनपणें । कासयाच्या 

प्रयोजनें ।।

प्रारब्धीं संसार । बरी हिमातीची 

थार ।।

होणार ते कांहीं । येथें अवकळा 

नाहीं ।।

तुका म्हणे देवें । कृपा केलिया 

बरवें ।।

🌻🌿🌻🌿

अभंग २४१२

महाराज पुढे म्हणतात अशारितीने हरिशी संबंध जोडून असल्याने आम्हां हरिच्या दासांना, म्हणजेच श्री हरि विष्णूदासांना या तिन्ही लोकांत कसलेही भय नाही, कसलीही चिंता सतावत नाही, कारण श्री हरि नारायण सतत आमच्या मागे-पुढे जातीने उभा असतो आणि आम्हां भक्तांवर आलेले संकट परतवून लावतो, किंबहुना त्याचे संपूर्ण निवारण करून आम्हांला त्यातून सुखरूप बाहेर काढतो. ते पुढे म्हणतात भक्तांनी केलेला धावा ऐकून,आणि वेळी-अवेळी दिलेल्या त्यांच्या हाकेला तो धावून जातो, आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांना हवे असलेले रूपधारण करतो, म्हणजेच भक्ताला ज्यावेळी जशी गरज आणि अपेक्षा असेल, म्हणजे कधी पैशाची, धनधान्याची, प्रेमाची, हिमतीची किंवा रक्षण कर्त्याची, तसे रूप घेऊन त्यांच्या दिमतीला तो हजर होतो. तुकोबाराय शेवटी म्हणतात अशारितीने आमचे सर्व कोड वेळोवेळी आणि आम्हांला हव्या त्यारितीने पुरविले गेल्याने आम्ही सतत आता विठोबाचे नाम मुखाने घेत आणि अखंड त्याच्या नामाचा जयघोष करत या संसारात हवे तेथे हिंडत-फिरत आहोत आणि अशा या मृत्यूलोकात जेथे दुःखच दुःख आहे तेथे आनंदाने आणि सुखात दिवस काढत आहोत.

आम्हां हरीच्या दासा काही । भय नाही 

त्रैलोकीं ।।

देव उभा मागे पुढे । उगवी कोडे 

संकट ।।

जैसा केला तैसा होय । धावे सोय 

धरोनि ।।

तुका म्हणे असो सुखे । गाऊ मुखे 

विठोबा ।।

अभंग १०४२

 

कारण पाहू जाता मनुष्य ह्या संसारात खऱ्या अर्थाने दुबळा असून परिस्थितीपुढे, प्रारब्धापुढे, आणि नित्य येणाऱ्या संकटापुढे तो हतबलच होऊन जातो आणि ह्या प्रकृतीपुढे तर तो नगण्यच असतो, परंतु ह्या सर्वांना जो कोणी परतवून लावू शकतो किंबहुना त्यांना आज्ञा करून जो कोणी त्यांना आपल्या अधीन ठेवू शकतो किंबहुना त्यावर सत्ताच गाजवतो, त्यावर राज्यच करतो असा सर्व शक्तिशाली आणि धुरंधर जो कोणी असेल त्यासोबत जर आपण संबध प्रस्थापित केले किंबहुना त्याच्याशी जर साटेलोटेच ठेवले तर चालू असलेल्या आयुष्याच्या अगदी विपरीत आयुष्य आपल्या पदरी येते, जे खऱ्या अर्थाने सुखदायी असून तो मनुष्य मग भाग्यवंतच गणला जातो.

तुकाराम महाराज म्हणतात म्हणून ह्या संसारात येऊन जो कोणी सर्वसमर्थ, सर्व शक्तिशाली आहे अशाशी नाते जोडणे, त्याला शरण जाऊन आणि त्याची सेवा करून त्याच्याशी घट्ट गाठ पडेल असे संबध प्रस्थापित करणे केव्हाही चांगले, म्हणजेच अशा ह्या आधीच नाशिवंत आणि बेभरवशाच्या संसारात येऊन बापुडे होऊन जगण्यापेक्षा अशाशी सुत जुळवून ठेवणे केव्हाही बरे आणि अंगी बळ नाही म्हणून खोटेपणाने आयुष्य कंठून शेवटी लंडीपणे मरण्यापेक्षा हिमतीचे जगणे केव्हाही चांगले, ताठ मानेने जगणे केव्हाही उत्तम. 

आणि एवढेच नव्हे तर देवाशीच जर साटेलोटे असेल, त्याच्याशीच जर अंतर्गत व्यवहार असेल तर त्याच्यापाशी असलेल्या खऱ्याखुऱ्या धनाचा सुगावा लागून त्याचे देखील भागीदार होता येते किंबहुना अशा त्या गुप्त धनाच्या भांडारावर बिनदिक्कातपणे हक्क दाखवून ते लुटता देखील येते आणि मुख्य म्हणजे कितीही लुटले तरीही त्याचा केव्हाही अंत होत नाही आणि त्याचापार देखील लागत नाही आणि अशारितीने आधीच्या जीवनापासून सर्वार्थाने विपरीत असे आयुष्य पदरी पाडून घेता येते. 

किंबहुना अशा आगळे-वेगळ्या आयुष्याचे धनी होऊन संसारात त्यापायी जो काही मान मिळतो किंवा जी काही कीर्ती पसरते किंवा जो काही नामलौकिक होतो तो काही औरच असून त्याला कशाचीही सर येत नाही किंबहुना ह्या संसारात येऊ असेच अजोड आणि सर्वोत्तम आयुष्य पदरी पाडून घेऊन तसे जगणे ह्यासाठी तरी देवाला शरण जावे.

🌻🌿🌻🌿

पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें 

खरी ।।

नये मरों लंडीपणें । काय बापुडें 

तें जिणें ।।

लुटावें भांडार । तरी जया 

नाहीं पार ।।

तुका म्हणे नांवें । कीर्ती आगळीनें 

ज्यावें ।।

🌻🌿🌻🌿

अभंग २३४९

तुकाराम महाराज पुढे म्हणतात अशा ह्या श्री हरिशी नाते जोडले असता किंवा त्याच्याशी गाठ बांधली असता त्याचे मग हृदयात आपोआपच चिंतन सुरु होते, ध्यानी मनी मग तोच भरून राहण्यास सुरुवात होते, जीवाला मग त्याचेच वेड लागते आणि मुख्य म्हणजे एकदा का देवाशी संबंध प्रस्थापित झाले की त्या संबंधाला मग कधीही विरहाचे दुःख भोगावे लागत नाही, कारण अशा ह्या नात्यात कधीच वियोग नसतो आणि एकदा का तसे घडून आले की मनुष्याच्या लाभाला देखील मग कसलेच उणे राहत नाही, किंबहुना लाभ आणि उण्याच्या तो पलीकडेच जातो आणि वर त्याच्या दैवाला तर काहीही पारच राहत नाही आणि अशाला मग शुभ शकुनच घडून आला असे म्हणतात. तसेच ज्या वाणीला अशारितीने मग श्री हरिच्या नामाचाच छंद जडतो अशी ती वाणी मग पूर्णपणे पवित्र आणि पुण्यवान झाली म्हणून समझावी.

तुकोबाराय शेवटी म्हणतात एवढेच नव्हे तर अशा या हरिच्या दासाला मग सर्व दिशा आणि सर्वकाळ हा शुभ काळ होऊन जातो, त्याच्यासाठी मग कोणताही काळ अशुभ न राहता सर्वकाळच त्यासाठी मंगळ होऊन जातो.

🌻🌿🌻🌿

अवघा तो शकुन । हृदयी देवाचे 

चिंतन ।।

येथे नसता वियोग । लाभा उणे 

काय मग ।।

छंद हरिच्या नामाचा । शुचिभूर्त सदा 

वाचा ।।

तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ 

अवघ्या दिशा ।।

🌻🌿🌻🌿

अभंग ९६१

तुकाराम महाराज पुढे म्हणतात आम्हां हरीच्या दासांना, म्हणजेच श्री हरि विष्णूच्या दासांना या तिन्ही लोकांत कसलेही भय नाही, कसलीही चिंता सतावत नाही, कारण श्री हरि नारायण सतत आमच्या मागे-पुढे जातीने उभा असतो आणि आम्हां भक्तांवर आलेले संकट परतवून लावतो, किंबहुना त्याचे संपूर्ण निवारण करून आम्हांला त्यातून सुखरूप बाहेर काढतो.

ते पुढे म्हणतात भक्तांनी केलेला धावा ऐकून, किंवा वेळी-अवेळी दिलेल्या त्यांच्या हाकेला तो धावून जातो, आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांना हवे असलेले रूप धारण करतो, म्हणजेच भक्ताला ज्यावेळी जशी गरज आणि अपेक्षा असेल, म्हणजे कधी पैशाची, धनधान्याची, प्रेमाची, हिमतीची किंवा रक्षण कर्त्याची, तसे रूप घेऊन त्यांच्या दिमतीला तो हजर होतो.

तुकोबाराय शेवटी म्हणतात अशारितीने आमचे सर्व कोड वेळोवेळी आणि आम्हांला हव्या त्यारितीने पुरविले गेल्याने आम्ही सतत आता विठोबाचे नाम मुखाने घेत आणि अखंड त्याच्या नामाचा जयघोष करत या संसारात हवे तेथे हिंडत-फिरत आहोत, आणि अशा या मृत्यूलोकात जेथे दुःखच दुःख आहे तेथे आनंदाने आणि सुखात दिवस काढत आहोत.

🌻🌿🌻🌿

आम्हां हरीच्या दासा काही । भय नाही 

त्रैलोकीं ।।

देव उभा मागे पुढे । उगवी कोडे 

संकट ।।

जैसा केला तैसा होय । धावे सोय 

धरोनि ।।

तुका म्हणे असो सुखे । गाऊ मुखे 

विठोबा ।।

🌻🌿🌻🌿

अभंग १०४२

भक्तीचे महत्व पटवून देतादेता तुकोबा सर्वांना दुसरीकडे भक्ती करण्यास आवाहन देखील करत आहेत आणि व्यवसायाने वाणी असल्या कारणाने देवाला वाण-सामानाचे/मालाचे रूपक लावून हाटेत/बाजारात जसे ओरडून लोकांना आपल्याकडील मालाचे वैशिष्ट्ये सांगावे आणि त्याचे गुण वाखाणून तो माल किती उत्तम प्रतीचा आहे असे सांगून तो घेण्यास आवाहन करावे तसे करत आहेत आणि पूर्वी देखील ह्या मालाचा कसा अनेकांना फायदा झाला आणि त्यापायी त्यांचे नशीब कसे फळाला आले हे सांगून ते त्या मालाची तारीफ करत आहेत, एवढेच नव्हे तर ह्या मालात काहीही खोट नसून तो गाठीशी बांधून घेतल्याने आजवर कोणीही फसले गेले नाही किंवा कोणाचाही केव्हाही घातपात देखील घडून आला नाही असे सांगून तो घेणारा शेवटी भाग्यवंतच ठरतो अशी त्या मालाची म्हणजेच पर्यायाने श्री हरिची स्तुतीच करत आहेत.

🌻🌿🌻🌿

भक्तीभाव आम्ही बांधिलासे गांठी । सादावितो हाटी 

घ्या रे कोणी ।।

सुखाचिया पेठे घातला दुकान । मांडियेले वान 

रामनाम ।।

सुखाचे फुकाचे सकळांचे सार । तरावया पार 

भवसिंधु ।।

मागे भाग्यवंत जाले थोर थोर । तिही केला फार 

हाचि सांटा ।।

खोटे कुडे तेथे नाही घातपात । तुका म्हणे चित्त 

शुद्ध तरी ।।

🌻🌿🌻🌿

तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करण्यास आवश्यक असलेला शुद्ध भक्तिभाव गाठीस बांधून ह्या संसाराच्या बाजारात / हाटात तो खपवण्यास आम्ही आलो आहोत आणि येणाजाणाऱ्या सर्वांना हाका मारून ‘माझ्याकडचा माल कोणी घ्यारे’ असे सांगून तो घेण्यास सादावत आहोत.

ते म्हणतात परमार्थरूपी सुखाच्या पेठेत/हाटेत जेथे केवळ खरे सुख मिळते अशा बाजारात मी 'रामनामाच्या मालाचे’ दुकान घातले असून तो माल/वाण घेण्यास सर्वांना आवाहन करत आहे.

ते पुढे म्हणतात असा हा माल सर्व सुखाचे सार असून वर तो फुकाचा देखील आहे, म्हणजेच त्यासाठी कसलेही मोल नसल्याने तुम्ही सर्वानी तो बिनसंकोचपणे घ्यावा अशी मी तुम्हांस विनंती करत आहे आणि एवढेच नव्हे तर हा संसाराचा भवसिंधु पार करण्यास देखील तो तुम्हाला साहाय्य करेल यातदेखील किंचितही संदेह नाही.

ते म्हणतात पूर्वी देखील जे अनेक भाग्यवंत होऊन गेले, जे थोर संत होऊन गेले त्यांनी देखील स्वतःकडे ह्याचाच साठा केला होता, म्हणजेच गाठीशी ह्याच मालाचा विपुल साठा करून ठेवला होता ज्याच्या साहाय्याने ते अंती भवसिंधुपार उतरले.

तुकोबाराय शेवटी म्हणतात त्यामुळे तुम्ही सर्वांनी देखील आता किंचितही वेळ न दवडता लगबगीने यावे आणि माझ्याकडील हे वाण घ्यावे, हवेतर मी तुम्हाला शाश्वती देतो की ह्या मालात वाईट, खोटेकुडे असे काहीही नाही आणि ह्याने कोणाचा घातपात देखील घडून येत नाही, उलट झाला तर सर्वांचा फायदाच होतो, परंतु त्यासाठी अट मात्र एकच आहे आणि ती म्हणजे घेणाऱ्याचे चित्त मात्र अतिशय शुद्ध आणि निर्मळ हवे.

अभंग १३१९

क्रमशः 

दीप न देखे अंधारा । आता हेचि जतन करा ॥१॥

नारायण नारायण । गाठी धन बळकट ॥२॥

चिंतामणीपाशी चिंता । तत्वता ही न येल ॥३॥

तुका म्हणे उभयलोकि । हेचि निकी सामुग्री ॥ ४ ॥